सुखबीर सिंह यांची याचिका फेटाळली
वृत्तसंस्था /अमृतसर
पंजाबमधील कोटकपूरा गोळीबार प्रकरणी फरिदकोट न्यायालयाने गुरुवारी सुनावणी करत माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. तर माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. याचबरोबर न्यायालयाने तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुखमंदर सिंह मान यांचीही जामीन याचिका फेटाळली आहे. जामीन अर्ज फेटाळला गेल्याने सुखबीर सिंह बादल यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे. तर अटक टाळण्यासाठी त्यांच्यासमोर उच्च न्यायालयात धाव घेण्याचा पर्याय आहे. यापूर्वी फरीदकोट न्यायालयाकडून गोळीबार प्रकरणी आरोपपत्रावरील सुनावणीनंतर माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल, उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यासह माजी पोलीस महासंचालक सुमेध सिंह सैनी तसेच 5 पोलीस अधिकाऱयांना स्वतःची बाजू मांडण्यासाठी 23 मार्च रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. कोटकपूरा गोळीबार प्रकरणी एसआयटीने 24 फेब्रुवारी 2022 रोजी फरीदकोट न्यायालयात 7 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.