वृत्तसंस्था/ पुणे
बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या पाचव्या टाटा खुल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या एन. श्रीराम बालाजी आणि एन. जीवन यांनी अमेरिकेच्या द्वितीय मानांकित जोडीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत बालाजी आणि जीवन यांना स्पर्धा आयोजकांनी पर्यायी स्वरुपी प्रवेश दिला होता. पण या जोडीने आतापर्यंत चांगली कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात श्रीराम बालाजी आणि जीवन यांनी अमेरिकेच्या द्वितीय मानांकित जॅक्सन विथ्रो आणि नाथानेल लेमन्स यांचा 7-6 (8-6), 7-6 (7-5) असा पराभव केला. मात्र भारताच्या रामकुमार रामनाथन आणि साथीदार मिगेल व्हॅरेला यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात टॉप सिडेड जोडीने राजीव राम आणि सॅलिसबेरी यांच्याकडून 2-6, 1-6 अशी हार पत्करावी लागली. या स्पर्धेमध्ये क्रोएशियाचा टॉप सिडेड मॅरीन सिलिकने गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे.
या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कॅरेटसेवने पेद्रो मार्टिनेजचा 6-1, 6-2 तर दुसऱया सामन्यात द्वितीय मानांकित बोटीक झेंडस्कलने मार्टरेरचा 6-4, 6-2, फ्रान्सच्या बाँझीने सर्बियाच्या क्रेसिनोविकचा 7-6, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले आहे.