ऑनलाईन टीम / तरुण भारत :
बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या युतीची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि प्रा. जोगेंद्र कवाडे (Jogendra Kawade) यांनी केली.
बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना कवाडे म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. बऱ्याच दिवसांपासून आमचे युतीसाठी प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्री शिंदे राज्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांना आश्वस्त करणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन आम्ही युतीबाबतचा निर्णय घेतला. शिवराय, शाहू-फुले-आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची ही युती आहे. गोरगरीबांच्या वंचितांच्या हक्कासाठी ही युती काम करेल. ही युती महाराष्ट्रात पाच जाहीर सभा घेणार आहेत. तिथे हजारोंच्या संख्येत लोक येतील. शिंदे हे भीम सैनिकांप्रमाणे संघर्षातून वर आले आहेत. त्यामुळे या युतीचा अभिमान आहे.
अधिक वाचा : धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जोगेंद्र कवाडे यांचा पक्ष संघर्षातून पुढे आला आहे आणि आमचा पक्षही संघर्षातून पुढे आला आहे. दोन्ही पक्षांचा संघर्ष साधा नव्हता. या युतीबाबत कोणताही संदर्भ जोडू नये. कोणत्याही देण्याघेण्यासाठी ही युती झालेली नाही. सरकार बदलल्यानंतर अनेकांनी युतीचा विषय मांडला आहे. ज्यांना आमचे विचार पटतात, त्यांचे पक्षात स्वागत आहे.