ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Ban on holding meetings in Koregaon Bhima historical pillar area दरवर्षी 1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक येतात. मागील वर्षी सरकारकडून निर्बंध होते. त्यामुळे यंदा याठिकाणी गर्दीची शक्यता असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ म्हणून प्रशासनाने विजयस्तंभ परिसरात सभेला बंदी घातली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
हिम्मत खराडे म्हणाले, 1818 साली कोरेगाव भीमा येथे पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध झालेल्या लढाईत गाजवलेल्या शौर्याबद्दल हा स्तंभ उभारण्यात आला आहे. या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी यंदा आठ ते दहा लाख नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. जिल्हा प्रशासनाकडून पूर्वतयारीबाबत संबंधित यंत्रणांसोबत बैठका सुरू आहेत.
अधिक वाचा : पुणे विमानतळावर आजपासून थर्मल स्क्रिनिंग
या कार्यक्रमाला नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन स्तंभ परिसरात 17 ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. पीएमपीकडून शहराच्या विविध भागातून 390 बस या ठिकाणी सेवा देणार आहेत. येणाऱया नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी 130 टँकर आणि पुनर्वापर करता न येणारे दोन लाख ग्लास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबरोबरच 150 आरोग्य सेवक आणि कर्मचाऱ्यांसह 15 रुग्णवाहिका या ठिकाणी तैनात ठेवण्यात येणार आहेत. कोरेगाव भीमा येथे यंदा तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे.