‘आप’चे आमदार वेंझी व्हिएगस यांचे मतदारसंघातील सरपंचांसह आवाहन
प्रतिनिधी /मडगाव
बाणावलीतील आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी बाणावली मतदारसंघातील सातही गावांतील सरपंचांसह सर्व बाणावलीकरांना एकजूट व्हा आणि म्हादई वाचवा अशी हांक दिली आहे तसेच आज सोमवारी सायंकाळी 4 वा. विर्डी-आमोणे पुलाजवळ, सांखळी येथे होणाऱया जाहीर सभेला मोठय़ा संख्येने हजर राहा, असे आवाहन केले आहे.
बाणावली मतदारसंघातील बाणावली, ओडली, केळशी, सुरावली, कोलवा, वार्का पंचायतांचे सरपंच तसेच करमणे पंचायतीच्या उपसरपंच यांच्यासह आमदार व्हिएगस यांनी म्हादई प्रश्नावर एकजूट दाखवून तिला वाचविण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी तसेच आमोणे-सांखळी येथील सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.
गोव्याच्या हितासाठी गोमंतकीयांनी एकजूट दाखविण्याची गरज आहे. त्याअनुषंगाने म्हादई नदीचे पाणी वळविल्यास त्याचे गोव्यावर कसे विपरित परिणाम होतील आणि पर्यावरणासाठी ते कसे घातक आहे त्याविषयी प्रत्येक गोमंतकीयाला जागरूक करायला हवे, असे आमदार व्हिएगस यांनी सांगितले.
म्हादईचे पाणी वळविल्यास होणार असलेले एकंदर परिणाम राज्यासाठी घातक असून या संवेदनशील विषयावर गोमंतकीय म्हणून आपली शक्ती आणि एकजूट दाखविण्याची गरज आहे. त्यासाठी आज सोमवारी सांखळीत होणार असलेल्या म्हादई बचाव सभेला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी केले. केळशी चर्चजवळून सभेला जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली असून ती दुपारी 2.30 वा. निघणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अन्य सरपंचांनी आपापल्या पंचायत क्षेत्रातील लोकांना म्हादई बचाव सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले व सभेला जाण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधेची माहिती दिली.