विशेष पथकाची नियुक्ती, नोंदणी होणार रद्द : उद्यापासून मोहिमेला प्रारंभ
► प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बांधकाम कामगारांची संख्या वाढली आहे. अशा बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी रद्दची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. कामगार खात्यामार्फत पथकाद्वारे बोगस बांधकाम कामगारांची तपासणी मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे आता बोगस बांधकाम कामगारांना दणका बसणार आहे.
गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. काहींनी बोगस कागदपत्रे देवून नोंदणी केली आहे. राज्य आणि केंद्रसरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बोगस बांधकाम कामगारांची संख्या वाढली आहे. अशा बोगस बांधकाम कामगारांची चौकशी होणार आहे. यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. 30 जानेवारीपासून ही मोहीम हाती घेतली जाणार आहे.
खोट्या कागदपत्रांची पूर्तता करून कामगारांच्या नोंदी
शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी खोट्या कागदपत्रांची पूर्तता करून बांधकाम कामगारांच्या नोंदी झाल्या आहेत. अशा कामगारांवर आता कारवाई होणार आहे. जिल्ह्यात 2 लाख 6 हजार 96 बांधकाम कामगार आहेत. या व्यतिरिक्त इतर बोगस कामगारांची संख्याही वाढली आहे. बोगस कामगारांची चौकशी होणार आहे. त्यामुळे येत्या काळात बोगस कामगार किती आणि खरे किती? हे स्पष्ट होणार आहे.
बोगस बांधकाम कामगारांनी स्वत:हून ओळखपत्रे (कामगार कार्डे) जमा केल्यास अशा कामगारांवर कारवाईचा बडगा टळणार आहे. मात्र बोगस कागदपत्रे पुढे करून कामगार कार्ड मिळविलेल्या कामगारांवर कारवाई केली जाणार आहे. कामगार खाते, तहसीलदार खात्यातील अधिकारी आणि तालुका पातळीवरील अधिकारी पथक बोगस कामगारांची चौकशी करणार आहे. बोगस कामगार कार्डे रद्द केली जाणार आहेत.
चौकशी दरम्यान बोगस कार्ड निघाल्यास कारवाई
कामगार कार्डाचा वापर करून शासकीय योजना आणि इतर आर्थिक लाभ उठविला जात आहे. चौकशी दरम्यान बोगस कार्ड निघाल्यास अशांवर कारवाई होईल. शिवाय आतापर्यंत घेतलेल्या सोयी-सुविधा आणि इतर बाबींबाबतही कारवाई केली जाणार आहे.
योजनांचा लाभ घेण्यासाठी बोगस कागदपत्रे
व्यंकटेश शिदीहट्टी (आयुक्त कामगार खाते)
बोगस बांधकाम कामगारांच्या नोंदी रद्द करण्यासाठी येत्या 30 तारखेपासून मोहीम हाती घेतली जाणार आहे. काही कामगारांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बोगस कागदपत्रे देवून कामगार कार्डे मिळविली आहेत. अशांवर कारवाई होणार आहे. विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.