वृत्तसंस्था/ जॉर्जटाऊन (गयाना)
यजमान विंडीज आणि बांगलादेश यांच्यात सुरू झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत बांगलादेशने विजयी सलामी दिली आहे. या मालिकेतील रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने विंडीजचा 6 गडय़ांनी पराभव केला. बांगलादेश संघातील मेहदी हसन मिराजला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. पावसामुळे हा सामना पंचांनी प्रत्येकी 41 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला होता. विंडीजने 41 षटकात 9 बाद 149 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने 31.5 षटकात 4 बाद 151 धावा जमवित हा सामना 6 गडय़ांनी जिंकला.
विंडीजच्या डावामध्ये एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यांच्या सहा फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. ब्रुक्सने 3 चौकारांसह 33, मेयर्सने 2 चौकारांसह 10, कर्णधार पुरनने 3 चौकारांसह 18, शेफर्डने 2 चौकारांसह 15, फिलिप्सने 1 षटकारासह नाबाद 21, सिलेसने नाबाद 16 धावा जमविल्या. विंडीजच्या डावामध्ये 10 चौकार आणि 1 षटकार नोंदविला गेला. बांगलादेशतर्फे मेहदी हसन मिराज आणि एस. इस्लाम यांची गोलंदाजी प्रभावी ठरली. मिराजने 36 धावात 3 तर एस. इस्लामने 34 धावात 4 गडी बाद केले. एम. रेहमानने 1 बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावामध्ये कर्णधार तमिम इक्बालने 25 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 33, नजमुल हुसेनने 46 चेंडूत 5 चौकारांसह 37, मेहमुदुल्लाने 69 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 41, नुरुल हसनने 27 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 20 धावा जमविल्या. दास 1 तर अकिब हुसेन 9 धावांवर बाद झाले. बांगलादेशच्या डावामध्ये 3 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे अकिल हुसेन, गुडाकेश मोती आणि पुरन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः विंडीज 41 षटकात 9 बाद 149 (फिलिप नाबाद 21, सिलेस नाबाद 16, बुक्स 33, पुरन 18, शेफर्ड 15, मेयर्स 10, एस. इस्लाम 4-34, मेहदी हसन मिराज 3-36, एम. रेहमान 1-34), बांगलादेश 31.5 षटकात 4 बाद 151 (तमिम इक्बाल 33, नजमुल हुसेन 37, मेहमुदुल्ला नाबाद 41, अकिब हुसेन 9, नुरुल हसन नाबाद 20, अकिल हुसेन, मोती आणि पुरन प्रत्येकी 1 बळी).