वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेश क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक रसेल डॉमिंगो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अलीकडेच भारताने बांगलादेशचा त्यांच्या भूमीत कसोटी मालिकेत 2-0 असा एकतर्फी पराभव केला होता. बांगलादेशने ही मालिका गमावल्यानंतर दोन दिवसातच डॉमिंगो यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपले पद सोडले.
डॉमिंगो यांनी या संदर्भात बांगलादेश क्रिकेट मंडळाला प्रमुख प्रशिक्षकपद सोडत असल्याचे कळवले आहे. डॉमिंगो हे दक्षिण आफ्रिकेचे रहिवासी असून आता ते मायदेशी रवाना होत आहेत. बांगलादेश क्रिकेट मंडळाला आता नव्या प्रशिक्षकपदाच्या शोधात राहावे लागेल. डॉमिंगो यांच्या मार्गदर्शनाखाली बांगलादेशने दक्षिण आफ्रिका विरुद्धची वनडे मालिका तसेच भारताविरुद्धची वनडे मालिका त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या मालिकाही जिंकल्या होत्या. आता नव्या वर्षाच्या प्रारंभी बांगलादेश क्रिकेट संघाला नवा प्रशिक्षक लाभणार आहे.