वृत्तसंस्था/ प्रोव्हिडेन्स (गयाना)
बांगलादेश क्रिकेट संघाने विंडीजच्या दौऱयात तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकत यजमान विंडीजचा ‘व्हाईटवॉश’ केला. शनिवारी येथे झालेल्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने विंडीजचा 4 गडय़ांनी पराभव केला. बांगलादेशच्या तमीम इक्बालला ‘मालिकावीर’ तर तैजुल इस्लामला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या शेवटच्या सामन्यात तैजुल इस्लामने 28 धावांत 5 गडी बाद केले.
या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विंडीजचा डाव 48.4 षटकात 178 धावांत आटोपला त्यानंतर बांगलादेशने 48.3 षटकात 6 बाद 179 धावा जमवित विजय नोंदविला.
विंडीजच्या डावामध्ये कर्णधार पूरनने 109 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 73, कार्टेने 66 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 33, पॉवेलने 1 षटकारासह 18, शेफर्डने 1 षटकार आणि 1 चौकारासह 19 धावा जमविल्या. विंडीजच्या केवळ 4 फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. कार्टे आणि पूरन यांनी चौथ्या गडय़ासाठी 67 धावांची भागिदारी केली. तब्बल 2 वर्षांनंतर पहिली वनडे खेळताना तैजुल इस्लामने 28 धावांत 5 तर नेसूम अहमद व मुस्ताफिजूर रेहमान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. एम. हुसेनने 1 गडी मिळविला. विंडीजच्या डावात 5 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावात कर्णधार तमीम इक्बालने 52 चेंडूत 4 चौकारासह 34, लिटॉन दासने 65 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 50 धावा जमविल्या. दास आणि इक्बाल यांनी दुसऱया गडय़ासाठी 50 धावांची भागिदारी केली. नजमुल हुसेन केवळ 1 धावेवर बाद झाला. मेहमुदुल्लाने 61 चेंडूत 1 चौकारासह 26, एम. हुसेनने 1 षटकार आणि 1 चौकारासह 14, नुरुल हसनने 38 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 32, मेहदी हसन मिराजने नाबाद 16 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 2 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे मॉटीने 23 धावात 4 तर जोसेफ आणि पूरन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीज संघाने ही वनडे मालिका गमविली असून आता त्यांची पुढील तीन सामन्यांची वनडे मालिका भारताबरोबर त्रिनिदाद येथे येत्या शुक्रवारपासून खेळविली जाणार आहे. या वनडे मालिकेनंतर भारत आणि विंडीज यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. या मालिकेनंतर विंडीजचा संघ न्यूझीलंडविरुद्ध 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
संक्षिप्त धावफलक – विंडीज ः 48.4 षटकात सर्वबाद 178 (पूरन 73, कार्टे 33, पॉवेल 18, शेफर्ड 19, तैजुल इस्लाम 5-28, नसुम अहमद 2-39, एम. रेहमान 2-24, एम. हुसेन 1-23), बांगलादेश ः 48.3 षटकात 6 बाद 179 (तमीम इक्बाल 34, लिटॉन दास 50, मेहमुदुल्ला 26, एम. हुसेन 14, नुरुल हसन नाबाद 32, मेहदी हसन मिराज नाबाद 16, गुडाकेश मोती 4-23, पूरन 1-38, जोसेफ 1-25).