वृत्तसंस्था/ ग्रॉस आयलेट
यजमान विंडीज संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशचा 2-0 असा खुर्दा केला. सोमवारी येथे झालेल्या दुसऱया व शेवटच्या सामन्यात खेळाच्या चौथ्या दिवशी विंडीजने बांगलादेशचा 10 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. विंडीजचा काईल मेयर्सला ‘मालिकावीर’ आणि ‘सामनावीर’ असा दुहेरी पुरस्कार मिळाला.
या दुसऱया कसोटीत बांगलादेशचा पहिला डाव 234 धावांत आटोपल्यानंतर विंडीजने पहिल्या डावात 408 धावा जमवित बांगलादेशवर 174 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव 45 षटकांत 186 धावांत आटोपल्याने विंडीजला निर्णायक विजयासाठी केवळ 13 धावांची जरूरी होती. विंडीजने दुसऱया डावात 2.5 षटकांत बिनबाद 13 धावा जमवित एकतर्फी मालिकाविजय हस्तगत केला.
रविवारी रात्री येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी चौथ्या दिवशी उपाहारापर्यंत खेळ होवू शकला नाही. पंचांनी मैदान आणि खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर खेळ सुरू करण्यास परवानगी दिली. बांगलादेशने 6 बाद 132 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केले आणि त्यांचे शेवटचे चार गडी 54 धावांची भर घालून बाद झाले. विंडीजच्या जोसेफने मेहदी हसन मिराजला 4 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर सिलेसने इबादत हुसेन आणि एस. इस्लाम यांना खाते उघडण्यापूर्वी बाद केले. शेवटचा फलंदाज खलीद अहमद धावचीत झाला. त्याला खाते उघडता आले नाही. बांगलादेशच्या नुरूल हसनने एकाकी लढत देत शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 50 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 60 धावा जमविल्या. विंडीजतर्फे केमर रोश, जोसेफ आणि सिलेस यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. या कसोटी मालिकेनंतर आता उभय संघात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला येत्या रविवारपासून डॉम्निका येथे प्रारंभ होणार आहे. टी-20 मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश प. डाव- सर्वबाद 234, विंडीज प. डाव 126.4 षटकांत सर्वबाद 408, बांगलादेश दु. डाव 45 षटकांत सर्वबाद 186 (नुरूल हसन नाबाद 60, नजमूल हुसेन 42, मेहमुदुल हसन 13, लिटॉन दास 19, शकीब अल हसन 16, रोश 3-54, जोसेफ 3-57, सिलेस 3-21).