Tarun Bharat

बांगलादेशचा झिंबाब्वेवर तीन धावांनी थरारक विजय

सामन्यातील शेवटचे षटक नाटय़मय, तस्कीन अहमद सामनावीर

वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन

आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे झालेल्या गट 2 मधील सामन्यात शेवटच्या नाटय़मय षटकाअखेर बांगलादेशने झिंबाब्वेवर केवळ तीन धावांनी थरारक विजय नोंदविला. बांगलादेशच्या तस्कीन अहमदला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यातील विजयामुळे गट 2 मध्ये आता बांगलादेश संघाने तीन सामन्यातून चार गुण मिळवले आहेत.

आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अशी घटना क्वचितच पाहावयास मिळते. झिंबाब्वेच्या मुजारबनीला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी शेवटच्या चेंडूवर 6 धावांची जरुरी होती. या शेवटच्या चेंडूवर बांगलादेशचा यष्टीरक्षक नुरुल हसनने मुजारबनीला चुकीच्या पद्धतीने यष्टीचित केले. मुजारबनीने या शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला पण तो हुकल्याने चेंडू यष्टीरक्षक नुरुल हसनकडे गेला. नुरुल हसनने चेंडू व्यवस्थित पकडून यष्टीसमोर येऊन त्याला यष्टीचित केले. पण ही कृती नियमानुसार नसल्याचे टीव्ही रिप्लेनुसार आढळून आल्याने झिंबाब्वेला पंचांनी फ्री हीट बहाल केली. तत्पुर्वी झिंबाब्वेचा डाव संपल्याने दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मैदान सोडले होते. पंचांनी पुन्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंना मैदानात बोलावून शेवटचा बाकी असल्याचे सांगितले. दरम्यान झिंबाब्वेला यावेळी विजयासाठी 4 धावांची जरुरी होती. पण मुजारबनीला फ्री हीटवर विजयी फटका न मारता आल्याने बांगलादेशने ही चुरशीची लढत केवळ तीन धावांनी जिंकली. फ्री हीटच्या मिळालेल्या संधीचा झिंबाब्वेला उपयोग करता आला नाही. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. या स्पर्धेमध्ये झिंबाब्वेने अटीतटीच्या सामन्यात पाकचाही असाच पराभव केला होता. पण याची पुनरावृत्ती झिंबाब्वेला बांगलादेशविरुद्ध करता आली नाही.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 150 धावा जमविल्या. त्यानंतर झिंबाब्वेने 20 षटकात 8 बाद 147 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना केवळ तीन धावांनी गमवावा लागला. गट 2 मध्ये झिंबाब्वे संघाने एक सामना जिंकला असून एक सामना गमविला आहे तर पावसामुळे झिंबाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना वाया गेला होता. झिंबाब्वेला तीन गुण मिळाले आहेत. बांगलादेश संघाचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे. या गटामध्ये गुणतक्त्यात बांगलादेशचा संघ सध्या दुसऱया स्थानावर असून झिंबाब्वेचा संघ चौथ्या स्थानावर आहे.

बांगलादेशच्या डावामध्ये सलामीचा फलंदाज नजमुल हुसेन शांतोने 55 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह 71 धावा झळकविल्या. सौम्या सरकारला खाते उघडता आले नाही. लिटॉन दासने 3 चौकारासह 14, कर्णधार शकीब अल हसनने 20 चेंडूत 1 चौकारासह 23 तर अफीफ हुसेनने 19 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 29 धावा जमविल्या. एम. हुसेनने 7 धावांचे योगदान दिले. नजमुल हुसेन आणि कर्णधार शकीब हसन यांनी तिसऱया गडय़ासाठी 54 धावांची भागीदारी केली. तसेच अफीफ हुसेनसमवेत त्याने चौथ्या गडय़ासाठी 36 धावांची भर घातली. टी-20 प्रकारातील नजमुल हुसेन शांतोचे हे पहिले अर्धशतक आहे. बांगलादेशने शेवटच्या 10 षटकात 87 धावा जमविल्या. बांगलादेशने शेवटच्या षटकामध्ये तीन गडी गमवले. बांगलादेशच्या डावात 2 षटकार आणि 12 चौकार नोंदवले गेले. झिंबाब्वेतर्फे निगेरेव्हा, मुजारबनी यांनी प्रत्येकी 2 तर सिकंदर रजा आणि सिन विलियम्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर झिंबाब्वेचे फलंदाज बाद झाले. सहाव्या षटकाअखेर झिंबाब्वेची स्थिती 4 बाद 35 अशी होती. पण अनुभवी सिन विलियम्सने चिवट फलंदाजी करत आपल्या संघाला विजयाच्या समीप नेले. दरम्यान तो शकीब अल हसनच्या अचूक फेकीवर धावचित झाला. विलियम्सने 75 चेंडूत 8 चौकारासह 64 धावा झळकविल्या. सिन विलियम्स 19 व्या षटकात बाद झाला. त्यानंतर झिंबाब्वेला शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी 16 धावांची जरुरी होती. तत्पुर्वी झिंबाब्वेच्या चेकाबेवाने 19 चेंडूत 15, इव्हान्सने 2, मध्वेरेने 4, कर्णधार इर्विनने 2 चौकारासह 8, शुंभाने 1 चौकारासह 8 धावा जमविल्या. ब्युरेलने 25 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 27 धावा जमवल्या. झिंबाब्वेच्या डावात 2 षटकार आणि 14 चौकार नोंदवले गेले. बांगलादेशतर्फे तस्कीन अहमद सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 19 धावात 3, मोसदेक हुसेनने 34 धावात 2 आणि मुस्ताफिजुर रेहमानने 15 धावात 2 गडी बाद केले.

झिंबाब्वेच्या डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी मोसदेक हुसेनला पाचारण केले. हुसेनने या षटकातील दुसऱया चेंडूवर ब्ा्रŸड इव्हान्सला अफीफ हुसेनकरवी झेलबाद केले. पण त्यानंतर झिंबाब्वेच्या रिचर्ड निगवेराने पुढील दोन चेंडूवर चौकार आणि षटकार खेचत अधिकच रंगत आणली. त्यानंतर हुसेनने निगवेराला पाचव्या चेंडूवर नुरुल हसन करवी यष्टीचित केले. झिंबाब्वेला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची जरुरी होती. पण शेवटच्या चेंडूवरील नाटय़मय घटनेनंतर बांगलादेशला निसटता विजय मिळाला.

संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश 20 षटकात 7 बाद 150 (नजमुल हुसेन शांतो 71, अफीफ हुसेन 29, शकीब अल हसन 23, लिटॉन दास 14, एन्गरेव्हा 2-24, मुजारबनी 2-13, सिकंदर रजा 1-35, विलियम्स 1-10), झिंबाब्वे 20 षटकात 8 बाद 147 (सिन विलियम्स 64, ब्युरेल नाबाद 27, चेकाबेवा 15, एन्गरेव्हा 6, एर्विन 8, शुंभा 8, तस्कीन अहमद 3-19, मोसदेक हुसेन 2-34, मुस्ताफिजूर रेहमान 2-15).

Related Stories

धावपटू पुवम्माची सराव शिबीरातून माघार

Patil_p

‘गब्बर’ने झळकावले सलग दुसरे शतक!

Patil_p

युवा विश्व वेटलिफ्टिंगमध्ये गुरुनायडू सेनापतीला सुवर्ण

Patil_p

फ्रान्स ग्रां प्रिमध्ये रेड बुलचा व्हर्स्टापेन विजेता

Patil_p

पॅरालिम्पिकमध्ये सिंहराज अधानाला कांस्यपदक

datta jadhav

फुटबॉलच्या महासंग्रामाला शानदार सुरुवात

Patil_p