वार्ताहर/आंबोली –
आंबोली नांगरतासवाडी येथील दह्याचा व्हाळ वळणावर दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वार निशिकांत पांडूरंग बागडी वय ४५ रा. हरळी ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर हे जागीच ठार झाले. तर त्यांचे सहकारी संतोष बजरंग शिंदे वय ४१ रा. वाटंगी ता. आजरा जि. कोल्हापूर हे गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी दह्यायाचा व्हाळ येथील वळणावर सकाळी साडे नऊ वाजणेच्या सुमारास घडली. अपघाताची खबर अपघातातील जखमी संतोष बजरंग शिंदे यांनी आंबोली पोलीसात दिली.
मिळालेल्या माहीती नुसार मोटर सायकलस्वार तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक चौकुळ शाखा व्यवस्थापक निशिकांत पांडुरंग बागडी (४५) रा.हरळी, गडहिंग्लज हे आणि त्याच शाखेत काम करणारे त्यांचे सहकारी संतोष बजरंग शिंदे वय ४१ हे दोघेजण निशिकांत बागडी यांच्या मालकीच्या मोटर सायकलने चौकुळ येथे कामावर येण्यासाठी निघाले होते. ते आंबोली नांगरतासवाडी येथील दह्याचा व्हाळ येथील वळणावर येताच आंबोलीहून आजरा येथे जाणारी टोयारो कंपनीच्या भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने त्या दोघांना ऊडवत तीस-चाळीस फूट फरफरट नेले. या अपघातात संतोष बजरंग शिंदे (४१) रा.वाटंगी आजरा याचे दोन्ही पाय जायबंदी झाले आहेत. दरम्यान 108 रुग्णवाहींकेने जखमीना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. यावेळी निशिकांत बागडी यांना मृत घोषित करण्यात आले.