Tarun Bharat

बाप्पा चालले गावाला…चैन पडेना आम्हाला!

‘गणपतीबाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या’ ची आर्त साद घालत जड अंतःकरणाने निरोप

प्रतिनिधी/ रत्नागिरी

गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेल्या पाच दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर सोमवारी गौरी-गणपतींचे भक्तिपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. जिल्हय़ातील 1 लाख 14 हजार 965 बाप्पांना सोमवारी निरोप देण्यात आला. गौरी-गणपतीला मोठय़ा प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असल्याने शहरातील मांडवी चौपाटीसह जिह्यातील प्रमुख विसर्जनस्थळांवर पोलीस यंत्रणेकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

    गणेशचतुर्थीला गेल्या बुधवारी वाजत-गाजत पारंपरिक पध्दतीने जिल्हय़ात सर्वत्र गणरायाचे आगमन करण्यात आले. दहा हजार बाप्पांना दीड दिवसांची सेवा केल्यानंतर निरोप देण्यात आला. यानंतर शनिवारी घरोघरी गौराईचे आगमन झाले. शनिवारी गौरीपूजन तर रविवारी जिल्हाभरात सर्वत्र सण साजरा करण्यात आला. गणेशचतुर्थीच्या दिवशी जिल्हाभरात 1 लाख 65 हजार गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाच्या संकटातून भयमुक्त झालेल्या भक्तगणांनी गौरी-गणपतीचा सण उत्साहात साजरा केला.

  घरी आलेल्या बाप्पाचे स्वागत जेवढय़ा जल्लोष आणि जोषात झाले तेवढय़ाच उत्साहात मात्र हळव्या अंतःकरणाने गणेशभक्तांनी सोमवारी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. पोलिसांचा फौजफाटा, सुरक्षारक्षक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदी कार्यकर्ते यांच्या मदतीने रत्नागिरीत विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. यावेळेस गणेश विसर्जन मिरवणुकांवर कोरोना नियमांचे बंधन नव्हते. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांना पारंपरिक ढोल, ताशांच्या गजराचा थाट पहावयास मिळाला. मांडवी समुद्रकिनारी सायंकाळी गणेश विसर्जनासाठी फार मोठी गर्दी झालेली होती. शहरासह साळवी स्टॉप, मारूती मंदीर, माळनाका, परटवणे आदी भागातील गणेशभक्त विसर्जनासाठी मांडवी समुद्रकिनारी हजेरी लावतात. त्यामुळे येथील विसर्जन घाटांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी मांडवी किनाऱयासह भाटय़े किनारी देखील कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विसर्जनावेळी मांडवी येथील गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी वाहतुकीचंही नियोजन केले होते.

   जिल्हाभरात बुधवारी पाच दिवसांच्या 1 लाख 14 हजार 965 आराध्यदैवत असलेल्या बाप्पांना ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’ अशी साद घालत जिह्यात भक्तगणांनी भावपूर्ण निरोप दिला. जिह्यातील समुद्र किनाऱयांबरोबरच, नदी, तलाव आदी विसर्जन घाटावर गणेशमूर्तींचे पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. येथील मांडवी तसेच भाटय़े समुद्रकिनारी गणेश विसर्जनासाठी फार मोठी गर्दी झाली होती. शहरासह साळवी स्टॉप, मारूती मंदीर, माळनाका, परटवणे आदी भागातील गणेशभक्तांनी विसर्जनासाठी मांडवी समुद्रकिनारी हजेरी लावली होती. कुणी पायी जात तर अनेकजणांनी वाहनातून गणपती नेत दुपारपासूनच विसर्जनासाठी किनारा गाठल्याचे चित्र होते.

   शहरी भागात मांडवी चौपाटी, किल्ला, भाटय़े, पांढरासमुद्र, मिऱया, कर्ला, राजीवडा, पांढरासमुद्र आदी भागात गणपतींचे विसर्जन करण्यात आले. नजिकच्या ग्रामीण भागातील गणपतींचे मिऱयाबंदर, काळबादेवी, साखरतर, आरेवारे, शिरगांव, गोळप, विसर्जन समुद्र व लहान मोठय़ा डोहांमध्ये पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. जिल्हाभरात हा सोहळा सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. 

@जिल्हय़ात झालेल्या गणपतींच्या विसर्जनाची संख्याः

जिल्हय़ात 14 सार्वजनिक आणि 1 लाख 14 हजार 965 गणरायांना निरोप देण्यात आला. त्यामध्ये रत्नागिरी शहरामधील 5 हजार 531 घरगुती तर 4 सार्वजनिक गणेशेमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. रत्नागिरीच्या ग्रामीण भागात 7 हजार 994 घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. जयगड परिसरात 1 हजार 717 घरगुती आणि 1 सार्वजनिक, संगमेश्वर 9 हजार 177 घरगुती, राजापूर 10,674 घरगुती, नाटे 5 हजार 632 घरगुती, लांजा 11 हजार 770 घरगुती, देवरूख 8 हजार 170, सावर्डे 9 हजार 322 घरगुती, चिपळूण 9 हजार 775 घरगुती आणि 3 सार्वजनिक, गुहागर 9 हजार 20 घरगुती, अलोरे 5 हजार 300 घरगुती, खेड 10 हजार 602 घरगुती तर 3 सार्वजनिक, दापोली 2 हजार 500 घरगुती तर 1 सार्वजनिक, मंडणगड 3 हजार 56 घरगुती तर 1 सार्वजनिक, बाणकोटमध्ये 395 घरगुती तर 2 सार्वजनिक, पूर्णगडमध्ये 3 हजार 351 खासगी आणि दाभोळमध्ये 1 हजार 279 खासगी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

Related Stories

रत्नागिरी जिल्ह्यात आज कोविशिल्डचा पहिला कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस

Patil_p

वादळानंतर मालवणात सापडले ‘शिणाणे’

NIKHIL_N

प्रभुंकडून रिफायनरीचे समर्थन

Patil_p

खानयाळेत २५ मार्चला ‘संगीत मत्स्यगंधा’

Anuja Kudatarkar

‘ऍप’साठी शाळांचा पालकांवर दबाव

NIKHIL_N

जिल्हा प्रशासनाकडून आरोग्य विभागाला पूर्वीप्रमाणे सूचना

Patil_p