पोर्ट ऑफ स्पेन
2022 च्या कॅरेबियन प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेत बार्बाडोस रॉयल्स संघाने प्ले ऑफ गटातील आपले स्थान निश्चित केले. या स्पर्धेतील सोमवारी झालेल्या सामन्यात बार्बाडोस रॉयल्सने गयाना अमेझॉन वॉरियर्सचा डकवर्थ लेविसच्या आधारे 29 धावांनी पराभव केला. खराब हवामानामुळे हा सामना प्रत्येकी 16 षटकांचा खेळविला गेला. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात सेंट लुसिया किंग्जने ट्रिनबॅगो नाईट रायडर्सवर केवळ एका धावेने थरारक विजय मिळविला.
सोमवारच्या पहिल्या सामन्यात गयाना अमेझॉन वॉरियर्सने नाणफेक जिंकून बार्बाडोस रॉयल्सला प्रथम फलंदाजी दिली. बार्बाडोस रॉयल्सने 16 षटकात 6 बाद 107 धावा जमविल्या. जेसॉन होल्डरने नाबाद 40 धावा जमविताना मुजीब उर रेहमानसमवेत 16 चेंडूत 39 धावांची भागीदारी केली. कॉर्नवॉलने 20 धावा जमविल्या. गयाना अमेझॉनतर्फे हेमराज चंद्रपॉलने 15 धावात 3 तर ज्युनियर सिंक्लेअरने 15 धावात दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना गयाना अमेझॉनने 16 षटकात 9 बाद 81 धावापर्यंत मजल मारली. त्यांना 16 षटकांत 111 धावांचे उद्दिष्ट मिळाले होते. ओडेन स्मिथने 15 धावा जमविल्या. बार्बाडोस रॉयल्सतर्फे कॉर्नवॉल आणि सायमंड्स व मॅकॉय यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या सामन्यात बार्बाडोस रॉयल्सच्या जेसॉन होल्डरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या स्पर्धेच्या गुणतक्त्यात बार्बाडोस रॉयल्सने 8 सामन्यातून 14 गुण घेत प्ले ऑफ गटातील आपले स्थान निश्चित केले. सेंट लुसिया आणि जमैका तलेवाज यांनी प्रत्येकी 8 गुण घेतले आहेत. पण सरस धाव सरासरीत सेंट लुसियाने जमैकाला मागे टाकले आहे. ट्रिनबॅगो नाईट रायडर्स संघ 7 गुणासह चौथ्या तर सेंट किटस् आणि नेव्हीस पेट्रीयट्स संघ सहा गुणासह पाचव्या स्थानावर आहे. गयाना अमेझॉन वॉरियर्सने 3 गुणासह शेवटचे स्थान मिळविले आहे. सेंट लुसिया किंग्ज संघाने विजय मिळवून प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.
संक्षिप्त धावफलक ः बार्बाडोस रॉयल्स 16 षटकात 6 बाद 107 (होल्डर नाबाद 40, कॉर्नवॉल 20, चंद्रपॉल हेमराज 3-15, ज्युनियर सिंक्लेअर 2-15), गयाना अमेझॉन वॉरियर्स 16 षटकात 9 बाद 81 (ओडेन स्मिथ 15, कॉर्नवॉल, सायमंडस् आणि मॅकॉय प्रत्येकी दोन बळी).