‘तरुण भारत’ वृत्ताची दखल
वार्ताहर /उचगाव
उचगाव-कोवाड या मार्गावरील बसुर्ते क्रॉस ते बेकिनकेरे या सरहद्दीतील रस्ता पावसाळय़ामध्ये रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली होती. या संदर्भात दैनिक ‘तरुण भारत’मधून वृत्त प्रसिद्ध करून यावरती आवाज उठवताच सदर रस्त्याच्या डागडुजीला बुधवारी प्रारंभ करण्यात आला.
बसुर्ते क्रॉस ते बेकिनकेरे या दोन किलोमीटर अंतराच्या पट्टय़ामध्ये पावसाळय़ात पाणी साचून मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक झालेली होती. संपूर्ण रस्ता खड्डेमय झाल्याने रस्त्यातून वाट काढत प्रवाशांना ये-जा करणे मुश्किल झाले होते. यावेळी दैनिक ‘तरुण भारत’मधून या रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेची छायाचित्रे काढून प्रसिद्ध करून शासनाला जागा आणली होती. याचबरोबर कामगार संघटनेने रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता. तसेच जिल्हाधिकाऱयांना भेटून रस्त्याच्या दुरुस्तीचे निवेदन दिले होते.
या सर्वांची दखल घेऊन तातडीने या रस्त्याची डागडुजी करण्यास प्रारंभ करण्यात आले आहे. यामुळे प्रवासीवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्त्याचे खडीकरण, याचबरोबर डांबरीकरण येत्या उन्हाळय़ात करावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.