आदिवासी महिलांमधील अनोखी प्रथा
जगात असे अनेक आदिवासी समुदाय आहेत, ज्यांच्या प्रथा इतरांना थक्क करणाऱया असतात. आदिवासी समुदायाचे लोक स्वतःच्या परंपरा अन् प्रथांचे पालन करत असतात. असाच एक आदिवासी समुदाय आफ्रिका खंडात आढळून येतो.
नामीबियात राहणारा हिंबा समुदाय अत्यंत अनोखा आहे. त्यांच्यात अपत्याच्या जन्मावरून अत्यंत रंजक परंपरा आहे. अन्य ठिकाणांप्रमाणे या समुदायात मुलाच्या जन्माची तारीख ग्राहय़ धरली जात नाही. तर अपत्याला जन्म देण्याचा विचार जेव्हा महिला करते, तो दिवस जन्मदिन म्हणून मानला जातो.
महिला एका झाडाखाली बसून मुलाशी निगडित गीत ऐकण्याचा प्रयत्न करते. जेव्हा तिला गीतासंबंधी संकेत मिळतात, तेव्हा हे गीत ती स्वतःच्या जोडीदाराला ऐकविते. महिला गरोदर राहिल्यावर ती समुदायातील अन्य महिलांना हे गाणे शिकविते. मग प्रसूतीदरम्यान सर्व महिला तिला हे गाणे ऐकवत असतात. मुलाच्या जन्मापासून ते मोठे होईपर्यंत गावातील प्रत्येक व्यक्तीला मुलाचे गीत तोंडपाठ होते. माणसाच्या अखेरच्या श्वासापर्यंत हे गाणे त्याला ऐकविले जाते.
हिंबा समुदायाच्या महिला स्वतःच्या जीवनात केवळ एकदाच स्नान करतात. ते देखील स्वतःच्या विवाहाच्या दिवशी. या व्यतिरिक्त त्या पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी देखील करू शकत नाहीत. या समुदायाच्या महिला स्वतःला साफ ठेवण्यासाठी विशेषप्रकारच्या वनौषधींना पाण्यात उकळवून त्याच्या वाफेद्वारे स्वतःला साफ ठेवतात. याचबरोबर त्वचेला उन्हापासून वाचविण्यासाठी महिला विशेष प्रकारचे चाटण वापरतात. हे चाटण प्राण्यांची कातडी आणि हेमाटाइट या खनिज तत्वापासून तयार करतात.