वाटसरूंना लुबाडण्याचे प्रकार; लोकांमध्ये भीती
पणजी : राजधानीतील कदंब बसस्थानकाजवळील पाटो कॉम्प्लेक्समधील (ईडीसी) प्रवेशद्वारापासून संपूर्ण कदंब-पाटो परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून रत्रीच्यावेळी पथदीप पेटत नसलयो काळोखाचा फायदा घेत गुंड प्रवृत्तीचे लोक वाटसरूंना लुबाडत असल्याचे प्रकार घडत आहेत. पाटो कॉम्प्लेक्स परिसराचा ताबा आर्थिक विकास महामंडळाकडे (ईडीसी) आहे. तर वीज खांबावरील पथदीपांचा ताबा वीजखात्याकडे आहे. वीज काते व ईडीसी यांच्यात वीज बिलावरून सध्या संघर्ष सुरू असल्यामुळेच या परिसरात बत्ती गुल झाली असल्याची माहिती हाती आली आहे. गोवा सरकारच्याच हाती वीजखाते आणि ईडीसी असूनही या भागात काळोखाचे साम्राज्य पसरले असून, या ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून वाटसरूंना लुबाडण्याचा प्रकार म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले’ असाच सुरू आहे. याचा अनुभवही याच भागातीर सरकारी कर्मचारी असलेल्या वाहनचालकाला आला आहे. त्याला लुबाडण्याचा प्रयत्न झाला आहे. याबाबत त्याने घाबरून पोलिसांत तक्रार दिली नसल्याचे सांगितले. यापरिसरातील गुंड लोकांविषयी पूर्वीच आपल्याच एका मित्राने आपल्याला सूचना देऊन सावध केले होते, अशी माहिती या सरकारी कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
पोलिसांत तक्रार दिल्यानंतर त्यानंतर होणारा ताप नको या भीतीपोटी कुणीही तक्रार देण्यास धजावत नाहीत. काही दिवसांपूर्वी ऊआ दी ओरेम खाडीवरील पायवाटेतील कितीतरी गुंड पोलिसांच्या जाळ्यात सापडले होते. आज प्रत्येक पोलिसांना पोलीस खात्यातर्फे रात्रीची टेहळणी करण्यासाठी दुचाकी वाहन पुरविले आहे तरीही पोलीस या परिसरात फिरकत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. पोलिसांची रात्रीची गस्त कमी पडत असल्याने आज लुबाडणीचे प्रकार वाढत आहे. आर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन सदानंद शेट तानावडे व वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी महत्त्वाच्या ठिकाणी वीज खांबावरील पथदिवे पेटविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी कॉम्प्लेक्समधील अनेक खासगी आस्थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच रहिवासीयांनीही केली आहे.
हाच काय तो सुंदर गोवा?
कदंब महामंडळाच्या पाटो कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या आंतरराज्य मार्गावरून सुटणाऱ्या बसस्थानकावर काळोखाचे साम्राज्य पसरत असल्याने या भागातील खड्यातून वाट काढतच बस शोधावी लागत आहे. बस शोधून देण्याचे काम बॅटरीद्वारे टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या कर्मचाऱ्यांनाच करावे लागते. हाच काय तो सुंदर गोवा असा अनुभव पर्यटकांना सद्य:स्थितीत येत आहे. निदान सुंदर गोव्यासाठी तरी कदंब महामंडळाच्या पाटो कॉम्प्लेक्स परिसराततरी विजेची सोय करावी अशी लोकांची मागणी आहे.