मुंबई / वृत्तसंस्था
दिल्ली कॅपिटल्स व पंजाब किंग्सचे संघ आज (बुधवार दि. 20) आयपीएल साखळी सामन्यात आमनेसामने भिडतील, त्यावेळी दोन्ही संघातील ‘पॉवर हिटर्स’मध्येच खरी लढत रंगणे अपेक्षित आहे. या लढतीच्या माध्यमातून दिल्लीची भिस्त वॉर्नर, शॉ, पंत तर पंजाबची भिस्त धवन, लिव्हिंगस्टोन, शाहरुख यांच्यावर असेल. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिशेल मार्श कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने इस्पितळात आहे. त्या धक्क्यातून सावरण्यावर दिल्लीला भर द्यावा लागेल. ही लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाईल.
बायो-बबलमध्ये आणखी कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी बीसीसीआयने ही लढत पुण्याऐवजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली संघातील सर्व सदस्यांची बुधवारी सकाळी आज आणखी एक चाचणी होणार असून त्याचे अहवाल निगेटिव्ह येणे क्रमप्राप्त असेल.
वॉर्नर, पृथ्वी शॉ व कर्णधार रिषभ पंत यांच्यामुळे दिल्लीची लाईनअप आणि शिखर धवन, बहरातील लियाम लिव्हिंगस्टोन व शाहरुख खान यांच्यामुळे पंजाबची लाईनअप मजबूत आहे. दोन्ही संघ विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्नशील असतील. त्यामुळे, अधिक जुगलबंदी रंगणे अपेक्षित आहे.
नियमित कर्णधार मयांक अगरवाल संघात परतत असल्याने पंजाब संघाला दिलासा लाभेल. मयांक यापूर्वी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध मागील लढतीत तळपायाच्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. शिखर धवनने मुंबई इंडियन्सविरुद्ध चुणूक दाखवली. मात्र, त्याच्या कामगिरीत सातत्य नाही, ही मुख्य चिंता आहे. सनरायजर्स हैदराबादविरुद्ध अपयशाची मयांकच्या साथीने भरपाई करण्याचा येथे त्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र, आतापर्यंत 11 बळी घेणारा बहरातील कुलदीप यादव समोर असल्याने धवन अँड कंपनीसमोर तगडे आव्हान असू शकते.
पंजाबच्या मध्यफळीतील फलंदाजांना देखील आणखी जबाबदारीने खेळावे लागेल. जितेन शर्माने आपण उत्तम फिनिशर ठरु शकतो, याचा दाखला दिला असून लिव्हिंगस्टोनचा अपवाद वगळता अन्य सर्व फलंदाज हैदराबादविरुद्ध लढतीत अपयशी ठरले आहेत. लिव्हिंगस्टोनने यापूर्वी 33 चेंडूत 60 धावांची आतषबाजी केली होती. अक्षर पटेल, शार्दुल ठाकुरच्या खात्यावर 4 बळी असून स्पीडस्टार खलील अहमदसह ते भेदक मारा करण्याची क्षमता राखून आहेत. मुस्तफिजूर मात्र आपला लौकिक राखू शकलेला नाही. यापूर्वी आरसीबीविरुद्ध लढतीत त्याला 48 धावा मोजाव्या लागल्या आहेत.
संभाव्य संघ
पंजाब किंग्स ः मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, अर्शदीप सिंग, कॅगिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, ऋतिक चटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन इलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्ष, बेन्नी हॉवेल.
दिल्ली कॅपिटल्स ः रिषभ पंत (कर्णधार), अश्विन हेब्बार, डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, पृथ्वी शॉ, रोव्हमन पॉवेल, ऍनरिच नोर्त्झे, चेतन साकरिया, खलील अहमद, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजूर रहमान, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, ललित यादव, मिशेल मार्श, प्रवीण दुबे, रिपाल पटेल, सर्फराज खान, विकी ओस्तवाल, यश धुल, केएस भरत, टीम सेफर्ट.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
पंजाबच्या गोलंदाजीची प्रामुख्याने रबाडावर भिस्त
वैभव अरोरा, अर्शदीप सिंग, राहुल चहर यांचा गोलंदाजी ताफ्यात समावेश असणाऱया पंजाबची भिस्त प्रामुख्याने कॅगिसो रबाडावर असणार आहे. याशिवाय, पेस-बॉलिंग ऑलराऊंडर ओडियन स्मिथची कामगिरी या संघासाठी महत्त्वाची ठरु शकते. पंजाबने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यात 3 विजय व 3 पराभव अशी संमिश्र कामगिरी केली आहे. दिल्लीचा संघ मात्र त्या तुलनेत थोडासा मागे राहिला आहे. त्यांना आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यात 2 विजय संपादन करता आले असून साहजिकच, वॉर्नर व शॉला सूर सापडणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
कोरोनाच्या उद्रेकामुळे लढत पुण्याऐवजी मुंबईत
दिल्ली संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआयने दिल्ली-पंजाब यांच्यातील ही लढत मुंबईत खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, हा सामना पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर खेळवला जाणार होता.
दिल्लीच्या पथकातील 5 सदस्यांना कोरोनाची लागण झाली असून यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिशेल मार्शचा प्रामुख्याने समावेश आहे. फिजीओ पॅट्रिक फरहार्ट, स्पोर्ट्स मेसेज थेरपिस्ट चेतन कुमार, टीम डॉक्टर अभिजीत साळवी व सोशल मीडिया कन्टेन्ट टीम मेंबर आकाश माने यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले. दिल्लीच्या सर्व खेळाडूंची आज सकाळी पुन्हा एकदा चाचणी होणार असून त्याचे अहवाल निगेटिव्ह आले तरच सामना निर्धोकपणे होऊ शकेल.
दिल्लीच्या पथकातील 5 कोरोनाग्रस्त सदस्य
अष्टपैलू मिशेल मार्श, फिजीओ पॅट्रिक फॅरहार्ट, स्पोर्ट्स मेसेज थेरपिस्ट चेतन कुमार, टीम डॉक्टर अभिजीत साळवी व सोशल मीडिया कन्टेन्ट टीम मेंबर आकाश माने