निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन राज्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आंतरराज्य पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र व गोव्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सीमेवर सतर्कता बाळगण्याचा निर्णय घेण्यात आला.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, कोल्हापूरचे आयजीपी सुनील फुलारी, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, कोल्हापूरचे जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर एच. टी., गुन्हे तपास विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदी अधिकारी उपस्थित होते.
विजयपूर, कलबुर्गी, कारवार, सांगली, सोलापूर, धाराशिव, सिंधुदुर्ग व गोव्यासह उत्तर विभागातील कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत भाग घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयार आदी अधिकाऱ्यांनीही बैठकीत भाग घेऊन निवडणुकीच्या काळात पोलीस दलाकडून घ्याव्या लागणाऱ्या खबरदारीविषयी चर्चा केली.
महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर सध्या तपासणी वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्र व गोवा पोलिसांची याकामी मदत मिळत आहे. निवडणुका जवळ येतील, तशी तपासणी आणखी तीव्र करण्याचे ठरविण्यात आले. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल, यासाठी सीमेवरील जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांना मार्गदर्शन
बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एन. सतीशकुमार यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बुधवारी सायंकाळी 6.30 वाजता या बैठकीला सुरुवात झाली. रात्री आठपर्यंत ही बैठक चालली. खासकरून बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.