शिवसेना नेते दिवाकर रावते यांचे आवाहन : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज रहा : प्रमुख पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद
प्रतिनिधी/कोल्हापूर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगामी काळात होत आहेत. या निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा. मतदार संघ, प्रभाग निहाय उमेदवारांची चाचपणी करा. या निवडणुकांच्या माध्यमातून बंडखोर शिंदे गटाला धडा शिकवा, असे आवाहन शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी जिल्हय़ातील शिवसैनिकांना केले.
जिल्हय़ातील शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते दिवाकर रावते शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी जिल्हय़ातील प्रमुख पदाधिकाऱयांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते.
रावते म्हणाले, शिवसेनेने यापुर्वीही बंडखोरांचा सामना केला आहे. या बंडामधून शिवसेना पुन्हा उभी राहिली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडताना मी बंगला सोडला आहे, जिद्द सोडलेली नाही असे वक्तव्य केले होते. त्यानुसार पक्षाची बांधणी पुन्हा बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे कष्ट घेत आहेत. बंडखोरांनी शिवसेना सोडली आहे. मात्र शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली आहे. त्यामुळे बंडखोरांचा विचार सोडा आणि जिल्हय़ात शिवसेना बळकट करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन रावते यांनी केले.
ते पुढे म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला आहे. त्यामुळे अगामी काळात महापालिका, जिल्हापरिषद, पंचायत समितीसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी आजपासून तयारी लागा. मतदार संघ, प्रभागानुसार उमेदवारांची चाचपणी करा. महिलांना पन्नास टक्के आरक्षण असल्याने महिला आघाडी सक्षम करा, असे आवाहन रावते यांनी बैठकीमध्ये केले.
पानगळ झाली, नवीन पालवी फुटणार
पावसाळय़ात पानगळ झाल्यानंतर नवीन पालवी फुटते त्याचप्रमाणे शिवसेनेतील पानगळ झाली आहे, आता नवी पालवी फुटणार आहे. राजकारणात डावपेच होत असतात. शिवसैनिक कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाही. आत्ता जे गेले त्यांनी आम्हला नवी संधी दिली आहे. शिवसैनिकांच्या पाठबळावर शिवसेना पुन्हा उभी राहणार असा विश्वास रावते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
हे ही वाचा : मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पुन्हा गजबजणार; विशेष कार्य अधिकारी म्हणून मंगेश चिवटेंची नियुक्ती
बैठकीला संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार सत्यजित पाटील, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहरप्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, समन्वयक हर्षल सुर्वे, युवासेना जिल्हाप्रमुख मंजीत माने आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.