प्रतिनिधी/ सातारा
सातारा तालुक्यातील एका गावात गुरूवारी 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. अत्याचारदरम्यान युवकाने तिला बेदम मारहाण केल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ पावले उचलत अरुण कैलास गायकवाड (वय 20) याला संशयित म्हणून अटक केली आहे. जिह्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची चार महिन्यातील ही चौथी घटना आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका फिरस्त्या कुटुंबातील एका 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. या घटना ताजी असतानाच गुरूवारी दुपारी 2 च्या सुमारास तालुक्यातील एका गावात एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही मुलगी आपल्या दोन भावंडासहीत शेतामध्ये गेली होती. यावेळी घरी परत येताना संशयित तिचा पाठलाग करू लागला. ही बाब तिच्या लक्षात येताच संशयिताने तिचे तोंड दाबून तिला बाजुला असणाऱया उसाच्या शेतात नेले. आणि तिच्यावर अत्याचार केला. यावेळी तिने विरोध करत झटापट केली. यामुळे संशयिताने तिला उसाने पाठीवर बेदम मारहाण केली. या मारहाणीत ती बेशुद्ध झाली. तिला शुद्ध येताच तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संशयिताने तिला दगड मारला. यात ती जखमी झाली. जखमी अवस्थेत मुलगी घरी गेली. घाबरत तिने घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या चुलत्यांना सांगितला. त्यांनी तत्काळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत संशयिताविरूद्ध पोक्सो, विनयभंग अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलीवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत असून तिची प्रकृती स्थिर आहे. तिची वैद्यकीय तपासणी सुरू असून त्यानुसार आणखी गुन्हे दाखल होणार असल्याचे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी सांगितले.
मुलीला चुलत्यांचा आधार
अत्याचार झालेली 11 वर्षीय मुलीचे आई-वडील हे लहानपणीच वारले आहेत. यामुळे तिच्यासह दोन भावंडाची जबाबदारी ही चलुत्यांवर आहे. तिचे चुलते हे विहीर खोदण्याचे, दगड फोडण्याचे काम करतात. या कामानिमित्त गेल्या 4 वर्षापासून ते तालुक्यातील एका गावात राहत आहेत. ही मुलगी एका मागासवर्गीय समाजातील आहे. तिची परिस्थितीही हलाकीची आहे.
चार महिन्यातील जिह्यातील ही चौथी घटना
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील 7 वर्षीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निघृण खून करण्यात आला. पाटण येथील गतीमंद मुलीवर नऊ जणांनी अत्याचार केला. काही दिवसापूर्वी सातारा शहरातून फिरत्या कुटुंबातील चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्या अत्याचार करण्यात आला. या घटना घडून काही दिवस उलटले आहेत. तोच गुरूवारी 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. सातारा जिह्यातील चार महिन्यातील अत्याचाराची ही चौथी घटना आहे. या घटनेमुळे पुन्हा मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.