वृत्तसंस्था/ टोरँटो
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या महिलांच्या कॅनेडीयन खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ब्राझीलच्या 26 वर्षीय बियाट्रिझ हदाद माइयाने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकला पराभवाचा धक्का दिला. अमेरिकेच्या पेगुलाने तसेच कोको गॉफनेही शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले.
या स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या सामन्यात ब्राझीलच्या बियाट्रिझ हदाद माइयाने पोलंडच्या टॉप सिडेड स्वायटेकचा 6-4, 3-6, 7-5 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. बियाट्रिझ हदाद माइयाचा स्वायटेकवरील हा पहिलाच विजय आहे. दुसऱया एका सामन्यात अमेरिकेच्या टॉप सिडेड जेसीका पेगुलाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना विद्यमान विजेती इटलीची कॅमिला जॉर्जीचा 3-6, 6-0, 7-5 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान पटकाविले. हा सामना दोन तास चालला होता. अमेरिकेच्या कोको गॉफने साबालेन्काचा 7-5, 4-6, 7-6 (7-4), रुमानियाच्या हॅलेपने टिचमनचा 6-2, 7-5 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.