शहराच्या विविध भागात स्टॉलवर विक्रीसाठी मूर्ती उपलब्ध : वेगळय़ा प्रकारची धाटणी असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेपल्याने गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील पेण येथून आणलेल्य सुरेख व रेखीव गणेशमूर्ती शहराच्या विविध भागात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. पेण येथील गणपतींची ही वेगळय़ा प्रकारची धाटणी असल्यामुळे दरवर्षी या गणेशमूर्तींना मोठय़ा प्रमाणात मागणी असते.
पेण हे गणपती तयार करणाऱया मूर्तिकारांचे गाव म्हणून ओळखले जाते. येथील मूर्तिकारांनी घडविलेल्या मूर्ती या विशेष असतात. सुबक आखणी, नेटकी बैठक, सुंदर कोरीव काम, डोळय़ांमधील तेज व भाविकांचे लक्ष वेधून घेणारे रंगकाम यामुळे या गणेशमूर्तींना बेळगावसह देशभरात मागणी असते. बेळगाव शहर तसेच उपनगरांमध्ये या गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. मागील वषीच्या
तुलनेत थोडीशी किंमत वाढली असली तरी गणेशोत्सवासाठी खर्च करण्याची तयारी भाविकांनी ठेवली आहे.
बेळगावमध्ये मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक गणेश मूर्तींसह घरोघरी गणराया विराजमान होतात. बेळगावमध्ये स्थानिक कलाकार गणेशमूर्ती घडवित असले तरी त्या अपुऱया पडत असल्यामुळे शेजारील कोल्हापूर, पेण येथून गणेशमूर्ती मागविल्या जातात. विशेषतः पेण येथील गणेशमूर्ती सुबक असल्यामुळे भाविकांची विशेष मागणी असते. बेळगावमध्ये गणेशमूर्ती आणल्यानंतर भाविकांना ज्या प्रकारचे रंगकाम हवे त्या प्रकारे ते केले जात आहे.
गणेशमूर्तींना भाविकांकडून मोठी मागणी : संतोष बडिगेर
मागील दहा वर्षांपासून नेहरूनगर येथे आम्ही पेण येथून गणेशमूर्ती आणत आहोत. पेण येथील गणेशमूर्ती सुबक व वेगळय़ा धाटणीची असल्यामुळे भाविकांची मोठी मागणी असते. आम्ही केवळ गणेशमूर्तीच देत नाही तर भाविकांच्या मागणीनुसार फेटा, धोतर, शाल व कुंदन वर्कदेखील केले जात असल्याचे संतोष यांनी सांगितले.
आकारमान-नक्षीकामानुसार मूर्तींचे दर
आकारमान व केलेल्या नक्षीकामानुसार गणेशमूर्तीचे दर ठरविण्यात येतात. एक हजार रुपयांपासून बारा हजार रुपयांपर्यंत नक्षीकाम केलेल्या गणेशमूर्ती ठिकठिकाणी दिसत आहेत. शहरातील एसपीएम रोड, वडगाव रोड, अनगोळ, टिळकवाडी, सदाशिवनगर रोड, नेहरूनगर रोड, काकतीवेस रोड या परिसरात गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल सुरू झाले आहेत. गणेशभक्तांकडून बुकिंगही सुरू करण्यात आले आहे.