केवळ गोव्यातील, देशातीलच नव्हे जगातील अत्त्याधुनिक प्रकल्प : मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक पेक्षाही मोठा प्रकल्प गोव्याला दिला : गोव्यातील रस्त्यांसाठी आतापर्यंत केंद्राकडून तीस हजार कोटी खर्च
प्रतिनिधी / वास्को
गोवा हे देशातील एक सुंदर राज्य आहे. ते सुंदरच राहायला हवे याची काळजी गोवेकरांनी घेतली पाहिजे. गोव्यातील महामार्गांचे सौदर्य खुलावे यासाठी या मार्गांच्या शेजारी फुलझाडांनी सौदर्यीकरण करण्यासाठी राज्य सरकारने कष्ट घ्यावे, असे आवाहन करताना केंद्रीय भुपृष्ट वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी झुआरी नदीवरील नवीन पुल गोवा आणि देशातीलच नव्हे तर जगातील एक अत्याधुनिक पुल असल्याचे प्रतिपादन केले. पुढील काळात गोवा देशातील एक प्रगत, समृध्द आणि संपन्न राज्य बनेल, असा विश्वास व्यक्त केला.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरूवारी रात्री झुआरी नदीवरील नवीन चौपदरी पुलाचे उद्घाटन करण्यात आले. झुआरीच्या नवीन पुलावर आयोजित केलेल्या भव्य उद्घाटन सोहळय़ाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय बंदर, जहाजबांधणी व जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल, वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, पर्यटनमंत्री रोहन खवंटे, कला व संस्कृती खात्य़ाचे मंत्री गोविंद गावडे, महसुलमंत्री बाबूश मोन्सेरात, मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर, मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री रवी नाईक, मंत्री सुभाष फळदेसाई, खासदार विनय तेंडुलकर, खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी मुख्यमंत्री व आमदार दिगंबर कामत, आमदार आलेक्स सिकेरा, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, कुठ्ठाळीचे आमदार अँथनी वास, सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर, महाराष्ट्रातील आमदार महेश बाल्डी, मुख्य सचिव पुनीतकुमार गोएल व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. या सोहळय़ाला व्यासपीठावरील मान्यवरांबरोबरच अन्य मंत्री व आमदारांचीही उपस्थिती होती. या सोहळय़ाला लोकांची प्रचंड उपस्थिती लाभली.
जगातील एक अत्त्याधुनिक प्रकल्प
गडकरी म्हणाले की झुआरी नदीवरील हा पुल गोव्यासाठी जीवनवाहिनी ठरणार आहे. हा पूल मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक पेक्षाही मोठा आहे. हा जगातील एक अत्याधुनिक प्रकल्प आहे. गोमंतकीयांना या पुलाचा अभिमान वाटत राहणार आहे. या पुलावर फिरते रेस्टारंट तसेच गोव्याचे दर्शन घडवणारा मनोरा निश्चित उभारला जाईल. हा मनोरा जागतिक आकर्षण ठरेल. निश्चितच हा प्रकल्प पूर्ण करू असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. गोव्यातील रस्त्यांच्या विकासासाठी आतापर्यंत केंद्राकडून तीस हजार कोटी खर्च करण्यात आलेले असून अनेक प्रकल्प व्हायचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पन्नास वर्षात न झालेला विकास आठ वर्षात झाला- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना मागच्या पन्नास वर्षांत या राज्यात जे झाले नाही ते मागच्या आठ वर्षात झाल्याचे सांगितले. अटल सेतूविषयी माहिती देतांना त्यांनी स्व मनोहर पर्रीकरांची आठवण काढली. गोव्यातील जनतेने भाजपाला यश देऊन भाजपा सरकारने केलेल्या विकासाचीच पावती दिलेली असल्याचे ते म्हणाले. नितीन गडकरी यांनी गोमंतकीयांना विकासाची स्वप्ने दाखवली व ती खरी करूनही दाखवली. त्यांनी गडकरी यांच्या सहकार्याने झालेल्या व होणाऱया प्रकल्पांची जंत्री वाचली. रेल, रोड, बंदराला जोडणाऱया सर्पुलर रोडचीही गोव्याला गरज असल्याचे ते म्हणाले. नव्या झुआरी पुलामुळे होणाऱया उपयोगाचीही त्यांनी माहिती दिली.
भाजपाने गोव्याचा विकास केला : नाईक
केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की झुआरीच्या नवीन पुलासाठी गोव्यातील जनतेने अनेक वर्षे कष्ट सोसले. आता या अडचणीतून जनता मुक्त होणार आहे. गोव्याने आतापर्यंत केंद्र सरकारकडे जे मागले त्यापेक्षा जास्तच सरकारने गोव्याला दिले. गोव्यात भाजपाच्या प्रारंभीच्या काळापासूनच गोव्याला सहकार्य लाभत आल्याचे ते म्हणाले.
साबांखामंत्री नीलेश काब्राल यांनी पुलांच्या विकासाचे श्रेय गडकरीनाच जात असल्याचे सांगितले. पुढील आठ महिन्यात राहिलेल्या चौपदरी पुलाचेही काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
पुलाच्या उभरणीत योगदान दिलेल्यांचा सन्मान
गडकरी यांच्या हस्ते नवीन पुलाच्या उभारणीत विशेष योगदान दिलेल्या शासकीय व खासगी कंपन्यांचे अधिकारी उत्तम पार्सेकर, प्रशांत फेगाडे, दिनेश गुप्ता, दत्तप्रसाद कामत, संजय अस्थाना, अतुल भोबे, अतुल जोशी यांचा सन्मान करण्यात आला. आमदार ऍथनी वास तसेच माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त गडकरींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.