ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उत्तर प्रदेशातील गँगस्टर अतिफ अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची शनिवारी प्रयागराजमध्ये गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. बीडमध्ये अतिफ आणि अश्रफ यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर दोघांच्याही हत्येचा निषेध करत त्यांचा शहीद असा उल्लेख करण्यात आला आहे.
बीडच्या माजलगांव शहरातील आंबेडकर चौकात अतिक आणि अश्रफला शहीद ठरवणारे आणि त्याच्या हत्येचा निषेध करणारे बॅनर झळकल्याने एकच खळबळ उडाली. मोहसीन भैया मित्र मंडळाकडून हे बॅनर लावण्यात आले होते. पोलिसांनी वेळीच हे बॅनर हटवले आणि संबंधितावर कारवाई करत दोघांना अटक केली आहे.
अतिक अहमदचा मुलगा असद व त्याच्या साथीदाराचे मागील आठवडय़ात युपी पोलिसांनी एन्काउंटर केले होते. असदचा दफनविधी होत नाही तोच दुसऱ्या दिवशी अतिक आणि अश्रफ यांना प्रयागराज येथे रुग्णालयात तपासणीसाठी नेत असताना दोघांवर गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर उत्तर प्रदेशात तणावाचे वातावरण होते. सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठली होती. याच दरम्यान, मंगळवारी बीडमधील आंबेडकर चौकात अतिक व अश्रफ यांच्या हत्येच्या निषेधार्थ बॅनर लावण्यात आले, त्यावर या दोघांचा शहीद असा उल्लेख करण्यात आला होता. या दोघांनाही स्वर्गात जागा मिळावी, असे बॅनरवर नमूद करण्यात आले होते.