ऑनलाईन टीम / श्रीनगर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 एप्रिलला पंचायत राज दिनानिमित्त जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तरी देखील गेल्या दोन दिवसांपासून येथे दहशतवादी कारवाया वाढल्या (before pm modi jammu kashmir visit terrorist activities increase) आहेत. दहशतवादी चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसह एकूण सहा दहशतवादी दोन दिवसात ठार झाले आहेत. तर सीआयएसएफचा एक जवान शहीद झाला असून नऊ जवान जखमी झाले आहेत.
जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या सुंजवानमधील चड्ढा कॅम्पसमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या बसवर शुक्रवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. सीआयएसएफने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात एक एएसआय शहीद झाला असून, चार जवान गंभीर जखमी झाले आहेत. चड्ढा कॅम्पसमधील या हल्ल्यानंतर सुजवानमध्ये शोधमोहिम राबविण्यात आली. त्यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. तर आणखी 5 जवान जखमी झाले.
दरम्यान, गुरुवारी बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसह चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे. असे दोन दिवसात सहा दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.