प्रतिनिधी /बेळगाव
बिबटय़ाच्या दहशतीमुळे मागील महिनाभरापासून बंद असलेल्या रेसकोर्समधील गोल्फ खेळाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे गोल्फ खेळणाऱया नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. बिबटय़ाने एकावर हल्ला करून रेसकोर्समध्ये आसरा घेतला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून येथील गोल्फ खेळ बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान रविवारी वनखात्याने कोम्बिंग ऑपरेशन राबवून बिबटय़ा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर रेसकोर्स परिसर सर्वांना खुला करण्यात आला आहे.
ट्रप कॅमेरे, मुधोळ श्वान, प्रशिक्षित हत्ती, आधुनिक तंत्राच्या माध्यमातून शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. अखेर बिबटय़ा रेसकोर्समधून सहीसलामत बाहेर निसटला आणि महिनाभर केलेले प्रयत्न अपयशी ठरले. 5 ऑगस्टपासून बिबटय़ाने रेसकोर्स परिसरात आसरा घेतला होता. तेव्हापासून बिबटय़ाचा शोध सुरू होता. दरम्यान खबरदारी म्हणून परिसरातील 22 शाळांना सुटी दिली होती. शिवाय रेसकोर्स परिसरातही बंदोबस्त वाढविण्यात आला होता. तसेच हा अडीचशे एकरचा परिसर पिंजून काढण्यात आला. बिबटय़ाच्या दहशतीमुळे येथील गोल्फ खेळही बंद ठेवण्यात आला होता. मात्र आता दोन दिवसांपासून गोल्फ खेळाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे मैदान गोल्फ खेळांनी बहरू लागले आहे.
मॉर्निंग वॉकर्सना रेसकोर्स खुला करा
रेसकोर्स परिसर हा अडीचशे क्षेत्रात दाट झाडीने नटलेला आहे. त्यामुळे या परिसरात सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत मॉर्निंग वॉकर्सची संख्या अधिक असते. शिवाय आबालवृद्ध फिरण्यासाठी मोठय़ा संख्येने दाखल होत असतात. मात्र बिबटय़ाच्या दहशतीमुळे मागील महिनाभरापासून रेसकोर्स परिसर मॉर्निंग वॉकर्ससाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, वनखात्याने रेसकोर्समधून बिबटय़ा निघून गेल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रेसकोर्सचा परिसर मॉर्निंग वॉकर्ससाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.