शहरात पारंपारिक वाद्यात मिरवणुका, मुहूर्तावर घटस्थापनेसाठी लगबग
प्रतिनिधी/ सातारा
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्रंबक्ये, गौरी, नारायणी नमस्तुतेच्या पवित्र्य मंत्रोच्चारात आई जगदंबाचा जल्लोष करत सोमवारी जिह्यात घरोघरी मोठय़ा उत्साही वातावरणात घटस्थापना करुन नवरात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. सातारा शहरातही मोठय़ा भक्तीमय वातावरणात पारंपारिक वाद्यात आगमन मिरवणुका काढून मुहूर्तावर घटस्थापना व प्रतिष्ठापना करण्यात आली. दोन वर्षानंतर दुर्गामाता उत्सव होत असल्याने मोठा उत्साह दिसून येत आहे. देवींच्या गोंधळगितांनी वातावरण भक्तीमय असे बनले होते. नागरिकांचे उपवास सुरु झाले असून गावोगावी ग्रामदेवतांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.
दोन वर्षाच्या काळानंतर दुर्गा उत्सव होत असल्याने प्रत्येक घरी या उत्सवाला वेगळेच महत्व आल्याचे दिसत आहे. या उत्सवाची धुम पहिल्याच दिवशी पहायला मिळत आहे. ग्रामीण भागात हा दुर्गाउत्सव एक पर्वणी मानली जाते. पहिल्याच दिवसांपासून उपवास असल्याने ग्रामप्रदक्षिणा घालण्यासाठी गावोगावी लगबग दिसून येत होती. ज्या दिवसाचा रंग त्याच दिवसाची साडी परिधान करण्याकडे महिलांचा कल दिसत होता. तसेच शहरात दुर्गामाता मंडळांकडून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी कुंभारवाडा ते मंडळांच्या ठिकाणापर्यंत ढोलताशाच्या गजरात मिरवणुका काढल्या जात होत्या. मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी सातारकरांनी चौकाचौकात गर्दी केली होती.
दरम्यान, उपवसाचे पदार्थ खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी दिसत होती. दरम्यान, सातारा शहरातील प्रमुख मानाच्या दुर्गा माता मंडळांपैकी प्रतापसिंह मंडळांची आगमन मिरवणूक सकाळी काढण्यात आली होती. मंडळाच्या कार्यकत्यांनी अगदी साधेपणाने ही मिरवणूक काढली. पंचपाळी हौद येथील दुर्गा मातेची पूजा विधीवत पद्धतीने करण्यात आले. दर्शनासाठी रांगा लागलेल्या दिसत होत्या. दरम्यान, पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त पहायला मिळत होता.
शहरात गरबा रास दांडिया आयोजकांवर पोलिसांची करडी नजर
यावर्षी निवडणुका जवळ असल्याच्या निमित्ताने अनेक इच्छुकांनी गरबा रास दांडियाचे आयोजन केले आहे. दांडिया खेळण्यासाठी महिला याव्यात यासाठी विविध स्वरुपाची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. आयोजकांकडून भुरळ घातली जात असली तरी पोलीस प्रशासनाकडून आयोजनकर्त्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. गैरप्रकार झाल्यास पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.