कुटुंबीयांनी व्यक्त केला घातपाताचा संशय
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळवट्टी येथील ग्राम पंचायत बिल कलेक्टरचा बुधवारी मृतदेह आढळून आला आहे. कुटुंबीयांनी खुनाचा संशय व्यक्त केला असून यासंबंधी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद झाली आहे.
गणपती सोमाण्णा कांबळे (वय 39) रा. आंबेडकर गल्ली, बेळवट्टी असे त्याचे नाव आहे. बुधवारी सकाळी गावातील एका गल्लीच्या क्रॉसवर त्याचा मृतदेह आढळून आला आहे. कुटुंबीयांना यासंबंधीची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाहून त्यांनी खुनाचा संशय व्यक्त केला.
बेळगाव ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून सीआरपीसी कलम 174 सी अन्वये संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. यासंबंधी बेळगाव ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला असता उत्तरीय तपासणीनंतर गणपतीचा मृत्यू कशामुळे झाला, याचा उलगडा होणार आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजता तो घराबाहेर पडला होता. रात्रीपर्यंत घरी परतला नव्हता. ज्या ठिकाणी गणपतीचा मृतदेह आढळला, त्या ठिकाणी मंगळवारी मध्यरात्री बारापर्यंत नागरिकांनी वर्दळ होती. त्यानंतर ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. उत्तरीय तपासणी अहवालानंतर तपासाला गती येणार आहे.