बेळगाव बार. असोसिएशनच्यावतीने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
बेळगाव न्यायालय आवारातील वकिलांच्या सभागृहामध्ये बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश मुस्तफा हुसेन यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
आपल्या भाषणात मुख्य न्यायाधीश हुसेन यांनी देशातील सर्व नागरिकांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली तत्त्व आणि शिकवणीशी समरस होऊन आपल्या जीवनात यशस्वी होणे गरजेचे आहे. आज आपल्या देशाची न्यायव्यवस्था त्यांनी दिलेल्या घटनेतील मार्गदर्शनानुसार यशस्वीरित्या चालत आहे हे लक्षात घेतले पाहिजे, असे सांगितले. यावेळी बार असोसिएशनचे सचिव ॲड. गिरीराज पाटील, ॲड. डी. एम. पाटील आणि ॲड. सद्रीमणी यांनी देखील समयोचीत विचार मांडले. कार्यक्रमास ॲड. बंटी कपाई, ॲड. पी. के. पवार, ॲड. उदोशी, ॲड. संतोष टि. के. आदींसह बहुसंख्य वकील तसेच सर्व न्यायालयाचे न्यायाधीश आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड. गिरीराज पाटील यांनी केले.