Tarun Bharat

बेळगावच्या हवामानाला व्हीव्हीपॅट नको

निजदचे सरचिटणीस फैजुल्ला माडीवाले यांची मागणी

प्रतिनिधी/ बेळगाव

आगामी निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरवरच मतदान प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट या डिजिटल उपकरणांवर विश्वासून चालणार नाही. कारण बेळगावच्या हवेमुळे या उपकरणांवर मॉईश्चर (ओलावा) पकडते. आणि ही उपकरणे चुकीचा निकाल देऊ शकतात. हे आजपर्यंत कोणीच लक्षात घेतलेले नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत बॅलेट पेपरचाच पर्याय उपलब्ध व्हायला हवा, अशी मागणी निजदचे राज्य सरचिटणीस फैजुल्ला माडीवाले यांनी केली आहे.

ते म्हणाले, निवडणुका पारदर्शी व्हायला हव्यात. परंतु अलिकडे निवडणुकांमध्ये दबावाचे राजकारण सुरू आहे. मतदान यादी पडताळणी सुरू असून, सर्वप्रथम प्रत्येक सज्ञान नागरिकाने आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तपासायला हवे. शिवाय प्रशासनाने मतदार यादी पडताळणीसाठी 8 डिसेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. ती 15 डिसेंबरपर्यंत वाढवायला हवी. मी सर्व सामाजिक व सेवाभावी संस्थांना व जनतेला आवाहन करतो की, त्यांनीसुद्धा मुदत वाढीची मागणी करावी व आपापल्या प्रभागातील मतदारांची नावे यादीत आहेत की नाही, यासाठी जागृती करावी.

ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर विश्वास नाही

ईव्हीएम व व्हीव्हीपॅटवर आपला विश्वास नाही. कारण बेळगावचे हवामान वेगळे आहे. डिजिटल उपकरणांवर मॉईश्चर पकडते. उदाहरणार्थ आपण जर मशिनद्वारे शुगर तपासली तर ती 450 येते आणि जर लॅबोरेटरीमध्ये 250 येते. हा फरक कोणीही लक्षात घेतलेला नाही. त्यामुळे उपकरणांची उपयुक्तता लक्षात घेतली तरी बेळगावच्या हवामानाला त्यांचा फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळेच झालेल्या निवडणुकीमध्ये आकडेवारी मागेपुढे होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एकाच व्यक्तीच्या नावे अनेक नावे

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारने आधारकार्डला विशेष महत्त्व दिले आहे. त्यामुळे व्होटर आयडी आधार कार्डाला लिंक करायला हवी. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे नाव कमी केले जाते. त्यामुळे आधारकार्डचा पर्याय आहे. एकाच व्यक्तीच्या नावे अनेक नावे असतात. या पद्धतीने मी स्वत: 40 हजार बोगस नावे वगळावीत यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे मतदारांनी जागरुक राहणे आवश्यक आहे, याकडे फैजुल्ला यांनी लक्ष वेधले आहे.

विकास करणाऱ्यालाच मत द्या

मतदान केंद्रावर पोलिंग एजंट ठेवण्याची आजीबात गरज नाही, असे सांगतानाच मतदान करण्यासाठी पैसा, भेटवस्तू यांना बळी पडू नका, 100 टक्के मतदान करा आणि जो उमेदवार आपल्या गावाचा विकास करू शकेल त्यालाच मत द्या, हे कळकळीचे आवाहन आपण करत आहोत, असे ते म्हणाले.

Related Stories

जिल्हय़ातील 900 जण क्वारंटाईनमध्ये

Patil_p

पूर्वभागात भात पीक पोसवणीस प्रारंभ

Patil_p

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आश्रमाला देणगी

Amit Kulkarni

मंगला अंगडी यांचा शहर परिसरात प्रचार

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हा संघ उपविजेता

Amit Kulkarni

हेस्कॉमचे रेल्वेस्टेशन येथील कार्यालय खुले

Patil_p