सौंदत्तीची अनुपमा हिरेहोळी राज्यात प्रथम
बेळगाव : बेळगाव शैक्षणिक जिल्ह्dयाचा दहावी परीक्षेचा निकाल 85.85 टक्के लागला आहे. सौंदत्ती येथील श्री कुमारेश्वर ईएम हायस्कूलची विद्यार्थिनी अनुपमा श्रीशैल हिरेहोळी हिने दहावी परीक्षेत 625 पैकी 625 गुण घेऊन राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. राज्यात बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची पुन्हा 26 व्या क्रमाकांवर घसरण झाली आहे. गतवर्षी 18 व्या क्रमांकावर असलेला शैक्षणिक जिल्हा पुन्हा पिछाडीवर गेला आहे. राज्यात दहावी परीक्षेत चित्रदुर्ग जिल्हा अव्वल ठरला आहे. सर्वात कमी निकाल यादगीर शैक्षणिक जिल्ह्याचा लागला आहे. मागील आठवड्यापासून उत्तरपत्रिका मूल्यमापन प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. दरम्यान, पेपर तपासणी वेळेत पूर्ण झाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने निवडणूक मतदानापूर्वीच सोमवारी निकाल जाहीर केला. दहावी परीक्षेत अधिक गुण घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होऊ लागले आहे. शिवाय मतदानापूर्वीच निकाल लागल्याने पालक आणि विद्यार्थ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. यंदा देखील बेळगाव शैक्षणिक जिल्ह्dयात मुलींनी बाजी मारली असून 89.25 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. 29 मार्च ते 15 एप्रिलदरम्यान दहावीची परीक्षा पार पडली होती. विविध ठिकाणी 124 परीक्षा केंद्रावर 31,678 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 27,048 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील काही वर्षांत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची टक्केवारीत चढउतार होऊ लागली आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी जिल्ह्याचा निकाल वाढविण्यासाठी धडपड सुरू केली होती. त्यामुळे मागील दोन वर्षांत जिल्ह्याची टक्केवारी वाढताना दिसत आहे. विद्यार्थ्यांना निकालाबाबत उत्सुकता आणि हुरहूर होती. सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून वेबसाईटवर निकाल उपलब्ध करण्यात आला. त्यामुळे ऑनलाईन सेंटरवर पालक व विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली होती.
सौंदत्तीच्या शिरपेचात मानाचा तुरा
सौंदत्ती येथील कुमारेश्वर इंग्रजी माध्यम शाळेची विद्यार्थिनी अनुपमा श्रीशैल हिरेहोळी हिने 625 पैकी 625 गुण घेऊन राज्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. त्यामुळे बेळगाव आणि सौंदत्तीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिने सौंदत्ती बरोबर शाळेचे व आपले नावदेखील उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशाबद्दल सौंदत्ती तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
केएलएसची गौरवी नायक राज्यात तिसरी
केएलएस इंग्रजी माध्यम शाळेची विद्याथिनी गौरवी नायक हिने घवघवीत यश संपादन केले आहे. शहरात प्रथम तर राज्यात तिसरी येण्याचा मान मिळविला आहे. तिने 99.68 टक्के गुण मिळविले आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. पीडीओ अऊण नायक यांची ती कन्या होय.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा विभागवार निकाल
- विभाग परिक्षेला बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी टक्केवारी
- रामदुर्ग 4073 3786 92.95
- खानापूर 3498 3146 89.94
- सौंदत्ती 4976 4418 88.79
- बैलहोंगल 3884 3417 87.89
- बेळगाव ग्रामीण 5595 4659 83.27
- कित्तूर 1715 1399 81.57
- बेळगाव शहर 7937 6223 78.4
- एकूण 31678 27048 85.85