बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी –
कर्नाटक राज्य सार्वजनिक शिक्षण खाते व शिमोगा जिल्हा शिक्षण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय माध्यमिक फुटबॉल स्पर्धेत बेळगाव विभागाच्या सेंटपॉल्स संघाने शेवटच्या साखळी सामन्यात बेंगळूरचा पराभव करून स्पर्धेत उपविजेतेपत पटकाविले. बेळगावच्या सहा खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे.
आज सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात बेळगाव विभागिय संघाला म्हैसुर संघाने 2-2 अशा बरोबरीत रोखले. या सामन्यात दुसर्या सत्रात जोस्वा वॉझ व नितन पिंटो यांनी गोल केले तर म्हैसुरतर्फे बी शरन व कृष्णा के. यांनी गोल केले. शेवटच्या साखळी सामन्यात सेंटपॉल्स बेळगाव विभागिय संघाने बेंगळूर ग्रामीण संघाचा 1-0 असा पराभव केला. या सामन्यात बेळगावच्या अथर्व बीडीने एकमेव गोल केला. या स्पर्धेत बंगळूर संघाला विजेतेपद, बेळगावला उपविजेतेपद तर डिवायईएस बेंगळुर संघाला तिसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. उपविजेत्या बेळगाव विभागिय संघाचे सहा खेळाडु राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटकात संघात निवड करण्यात आली आहे. या संघाचे प्रशिक्षक गिरीष गणेशकर, अल्लाबक्ष बेपारी यांचे या संघाला बहुमोल मार्गदर्शन लाभले.