क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
म्हैसूर येथे कर्नाटक राज्य व म्हैसूर दसरा क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा ज्युडो स्पर्धेत बेळगावच्या डीवायईएस ज्युडो संघाने महिलांच्या गटात सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. चामुंडेश्वर मैदानावर झालेल्या या ज्युडो स्पर्धेत महिलांच्या 48 किलो वजनी गटात रम्याने सुवर्ण तर ऐश्वर्याने रौप्य, 52 किलो वजनी गटात गीता के.डी. हिने सुवर्ण, रक्षिता कोमराने रौप्य, 57 किलो वजनी गटात अक्षता सुनकडने सुवर्ण, 63 किलो वजनी गटात वसुंधरा एम. एन. हिने सुवर्ण, 70 किलो वजनी गटात पार्वती ए. हिने सुवर्ण, 78 किलो गटात साईश्वरी जी. के. हिने रौप्य, 78 किलोवरील वजनी गटात भूमिका व्ही. एन. हिने कांस्यपदक पटकाविले. मुलांच्या गटात 160 किलो वजनी गटात प्रकाश वाय. याने रौप्य तर अरुण मालीने कांस्य पदक पटकाविले. बेंगळूरच्या ज्युडो प्रशिक्षिका त्रिवेणी सिंग यांच्या हस्ते सर्वसाधारण विजेत्या बेळगाव डीवायईएस संघाला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. त्यांना ज्युडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील व कुतुजा मुलतानी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.