कालमणीजवळ झाड कोसळल्याने समस्या : वाहनांच्या रांगा
वार्ताहर / कणकुंबी
जांबोटी-कणकुंबी रस्त्यावरील कालमणीजवळ बुधवारी रात्री दोन झाडे रस्त्यावर कोसळल्याने बेळगाव-पणजी या राज्य महामार्गावरील वाहतूक तब्बल साडे आठ तास ठप्प झाली होती. पोलीस प्रशासन आणि वनखात्याच्या प्रयत्नामुळे गुरुवारी सकाळी 10 वाजता रस्ता मोकळा करण्यात आला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरळीत सुरू झाली.
गोव्याला जोडणारा जवळचा रस्ता म्हणून चोर्ला रस्त्याला नेहमीच पसंती दिली जाते. अशाचप्रकारे कालमणी गावाजवळ निवारा धाब्याच्यासमोर असलेली जुनाट दोन झाडे बुधवारी रात्री दीड-दोनच्या सुमारास उन्मळून रस्त्यावर पडली. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक रात्री दीड-दोन वाजल्यापासून ते सकाळी साडे दहावाजेपर्यंत ठप्प झाली होती. दरम्यान, सदरची माहिती जांबोटी पोलिसांना मिळताच पोलीस हवालदार सनदी व पोलीस कॉन्स्टेबल नन्नेखान यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर जांबोटी सेक्शन फॉरेस्ट ऑफिसर निरवाणी यांना माहिती देण्यात आली. वनरक्षक पप्पू होसमणी यांनी झाडे बाजूला सारून रस्ता मोकळा करून दिला. जवळपास साडे आठ तास वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. यामध्ये चारचाकी वाहनाबरोबरच कर्नाटक आणि गोव्या राज्याच्या बसेस तसेच टेम्पो, ट्रक अशी अनेक अवजड वाहनेही होती.