बेळगाव : एकेकाळी गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावची ओळख आता प्रदूषित शहर म्हणून होवू लागली आहे. हवेच्या प्रदूषणाचा अभ्यास करणारी स्वीस यंत्रणा आयक्युएअरने जागतिक हवा गुणवत्ता अहवाल प्रकाशित केला. यामध्ये भारताचा क्रमांक आठवा आहे. तर कर्नाटकात बेळगाव हे सर्वात प्रदूषित शहर म्हणून नोंद झाली आहे. प्रदूषित शहरामध्ये 2021 मध्ये बेळगावचा क्रमांक चौथा होता. पण 2022 मध्ये तो आता पहिल्या क्रमांकावर आला आहे. बेळगावच्या पीएम 2.5 सरासरीत मोठी वाढ झाली आहे. 2021 मध्ये ती 28.1 युजी/एमथ्री इतकी होती. त्यात सातपटीने वाढ होवून ती 45.0 झाली आहे. हवेतील सूक्ष्म कण प्रदूषणाला पीएम 2.5 असे म्हटले जाते. जे आरोग्यासाठी घातक समजले जाते. वाढत्या सूक्ष्म कणांच्या प्रदूषणामुळे प्रदूषित हवेची पातळी ही 28.1 आहे जी जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या पातळीच्या सहापट अधिक आहे.
आरोग्याच्या समस्या
प्रदूषित हवेमुळे नागरिकांना दमा, स्ट्रोक, हृदय आणि यकृताचे विकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेकांचे मृत्यूही होत आहेत. अलिकडे शहरात वाहनांची वर्दळ अमर्याद वाढली आहे. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. वृक्षांची कत्तल होत असून सिमेंटचे जंगल वाढत आहे. लोकांना मोकळी आणि स्वच्छ हवा मिळणे कठीण होवू लागले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे दुर्दैवाने बेळगाव हे सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून गणले जात आहे.