तामिळनाडूच्या तीन संशयिताकडे 1.75 लाखांचा ऐवज
प्रतिनिधी / मडगाव
1.75 लाख रुपये किंमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरीप्रकरणी टिळकवाडी- बेळगाव पोलिसांनी मडगावात येऊन तीन आरोपींना अटक केली.
रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाना तमीळनाडूतील तीन प्रवासी मडगाव रेल्वे स्थानकाच्या विश्रामगृहात बसलले आढळले. त्यांची हालचाल संशयास्पद दिसल्याने दलाच्या जवानानी त्यांना हटकले. त्यांच्या सामानाची तपासणी केली. या तपासणीत 1.75 लाख रुपये किंमतीच्यग इलेक्ट्रॉनिक वस्तू त्यांच्याकडे सापडल्या.
या वस्तूसंबंधी या संशयितांकडे चौकशी केली तेव्हा ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. परिणामी दलाच्या जवानानी त्यांना ताब्यात घेतले. उमानाथ राधाकृष्णन, अरुणकुमार आणि अगंबरम अशी या तीन संशयितांची नावे आहेत.
मडगाव रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक विनोद मिश्रा यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार दलाचे जवान रेल्वे स्थानकावर गस्त घालत असता त्यांना वरील तीन व्यक्ती विश्रामगृहात संशयास्पदरित्या बसलेले आढळले. त्यांच्यावर त्याना न कळत पाळत ठेवण्यात आली होती. आणि नंतर त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यांच्याकडे लॅपटॉपसारख्या 1.75 लाख रुपयांच्या वस्तू सापडल्या. ही माहिती बेळगाव पोलिसांना देण्यात आल्यानंतर टिळकवाडी-बेळगाव पोलीस मडगावात येऊन वरील तिन्ही संशयितांना अटक केली.