प्रतिनिधी /बेळगाव
विमान प्रवास करणाऱया प्रवाशांच्या सोयीसाठी बेळगाव रेल्वेस्थानक ते सांबरा विमानतळ अशी बससेवा 2 जूनपासून सुरू होत आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते या बससेवेचे उद्घाटन होणार आहे.
बेळगावहून सांबरा विमानतळापर्यंत किंवा सांबरा विमानतळापासून बेळगावपर्यंत येण्यासाठी प्रवाशांना वाहनाची विशेष अशी सोय नव्हती. रिक्षा किंवा टॅक्सी याशिवाय पर्याय नसल्याने दामदुप्पट दर मोजून प्रवासी बेळगावला येत होते. बऱयाच कालावधीपासून सांबरा विमानतळ ते बेळगाव रेल्वेस्थानक अथवा मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत रेल कार सुरू करावी, अशी मागणी प्रलंबित होती.
याबाबत अलीकडेच परिवहन मंडळ आणि विमानतळ प्राधिकरणाने बैठक घेऊन चर्चा केली आणि चर्चेअंती अशी बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता सांबरा विमानतळ ते बेळगाव रेल्वेस्थानक अशी मध्यवर्ती बसस्थानकमार्गे जाणारी खास बस गुरुवारपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे. या बसचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.