बेंगलोर संघाला विजेतेपद : वेदांत सुतारची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
म्हैसूर येथे सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात बेंगलोर विभागीय संघाने बेळगाव विभागीय संघाला पराभव करुन विजेतेपद पटकाविले तर बेळगावला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. वेदांत सुतार याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे.
म्हैसूर येथे झालेल्या राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत पहिल्या सामन्यात बेळगाव विभागीय संघाने म्हैसूर विभागीय संघाचा 19-14 अशा गोलफरकाने पराभव केला. दुसऱया सामन्यात गुलबर्गा विभागीय संघाचा 18-11 असा पराभव केला. तर अंतिम सामन्यात बेंगलोर संघाने बेळगाव संघाचा 18-16 अशा गोलफरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. या खेळांडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक जयसिंग धनाजी यांचे मार्गदर्शन तर संस्थेचे अध्यक्ष ऍड. चंद्रहास अण्वेकर, मुख्याध्यापिका डॉ. नविना शेट्टीगार यांचे प्रोत्साहन लाभले आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघात निवड झाल्याबद्दल वेदांतचे अभिनंदन होत आहे.