पहिल्या दिवशीचे बुकिंग फुल्ल : एक्प्रेस कायम करण्याची प्रवाशांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-सिकंदराबाद एक्प्रेस मंगळवार दि. 17 पासून धावणार आहे. या एक्प्रेसमुळे बेळगावहून हैदराबाद परिसरात जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. मागील दोन ते अडीच वर्षापासून बेळगाव-हैदराबाद बंद असलेली एक्प्रेस पुन्हा एकदा सुरू झाल्याने प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. पहिल्या दिवशीचे बुकिंग फुल्ल झाले असल्याने बेळगाव-सिकंदराबाद एक्प्रेस कायम करण्याची मागणी केली जात आहे.
रेल्वे क्रमांक 07335 ही एक्प्रेस दररोज दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी बेळगावमधून निघणार असून दुसऱ्या दिवशी पहाटे 5.50 वाजता सिकंदराबाद येथे पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी निघालेली एक्प्रेस दुसऱ्या दिवशी दुपारी 3.55 वाजता बेळगाव रेल्वेस्थानकात पोहोचणार आहे. हैदराबादपासून सिकंदराबाद हे जंक्शन अवघ्या काही मिनिटांवर आहे. त्यामुळे सिकंदराबाद येथे पोहोचून तेथे हैदराबाद गाठता येते.
पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद
अडीच वर्षांनी हैदराबादसाठी रेल्वे सुरू असल्याने प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. पहिल्याच दिवशीचे बुकिंग फुल्ल झाले असून वेटिंग लागण्याची शक्यता आहे. स्लीपरसह एसी कोचचे बुकिंग फुल्ल झाल्याने रेल्वेलाही चांगला महसूल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपातील असणारी ही एक्प्रेस रेल्वेने कायम करावी, अशी मागणी होत आहे.
सर्वसामान्यांना परवडतील असे दर
बेळगाव ते सिकंदराबाद हा 16 तासांचा प्रवास असणार आहे. स्लीपर कोचसाठी 545 रुपये तिकिट दर असणार आहेत. 3 ए साठी 1475 तर 2 ए साठी 2055 रुपये तिकिट दर निश्चित करण्यात आले आहेत. खासगी ट्रॅव्हल चालकांपेक्षा हे दर कमी असल्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारे दर आहेत.