केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागिय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने युनियन जिमखाना संघाचा 7 गडय़ांनी पराभव केला. शतकवीर अमेय भातकांडे व अष्टपैलू खेळी खेळलेल्या विजयकुमार पाटील यांना विभागून सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तर रविवारच्या सामन्यात बीडीके अ संघाने नीना स्पोर्ट्स संघाचा 90 धावानी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. शतकवीर अमर घाळी याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 गडी बाद 223 धावा केल्या. त्यात अमेय भातकांडेने 2 षटकार 12 चौकारासह 101 धावा करून शतक झळकविले. त्याला आर्यन इंचलने 5 चौकारासह 58, अदोक्ष एम. ने साबाद 26 तर वैष्णव संघमित्रा व सईद एम यांनी प्रत्येकी 12 धावा करून साथ दिली. बेळगाव स्पोर्ट्सतर्फे आकाश कटांबळेने 2, राकेश पाटील व आकाश कुलकर्णी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ ने 32.1 षटकात 3 गडी बाद 224 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. त्यात सुजय सातेरीने 2 षटकार 6 चौकारासह नाबाद 56, शुभम नेसरीकरने 9 चौकारासह 55, वेंकटेश शिराळकरने 2 षटकार 9 चौकारासह 54, तर विजयकुमार पाटीलने 1 षटकार 5 चौकारासह नाबाद 36 धावा केल्या. जिमखाना तर्फे अदोक्षजने 2, गौस पिर हाजीने 1 गडी बाद केला.
रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बीडीके ए हुबळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 48.5 षटकात सर्व गडी बाद 351 धावा केल्या. त्यात अमर घाळीने नाबाद 106 धावा करून शतक झळकविले. शुभम उमाजीने 50, शतक गुंजाळने 47, निलेश खिलारे व अनिरूद्ध जोशी यांनी प्रत्येकी 25, सौरभ सामंतने 22, तर कृष्णाप्पा बगडीने 21 धावा केल्या. नीनातर्फे धृव नाईक, संतोष सुळगे पाटील, माजीद मकानदार यांनी प्रत्येकी 2 तर प्रशांत मुतगेकर, अंगदराज हित्तलमनी व नवीन शिरगावी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना नीना स्पोर्ट्स क्लबचा डाव 42.5 षटकात 261 धावात आटोपला त्यात अंगदराज हित्तलमनीने 83, संतोष सुळगे पाटील व अभिषेक देसाई यांनी प्रत्येकी 39 तर माजीद मकानदारने 38 धावा केल्या. बीडीकेतर्फे कृष्णाप्पा बाडगीने 3, अनिरूद्ध जोशी, हार्दिक ओझा, फरहान पाटील यांनी प्रत्येकी 2 तर प्रथमेश साळुंखेने 1 गडी बाद केला.