प्रतिनिधी /बेळगाव
शिमोगा येथे शिक्षण खात्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत माध्यमिक मुलांच्या गटात बेळगावच्या सेंट पॉल्स संघाने डीवायईएस संघाला 1-1 अशा बरोबरीत रोखले तर दुसऱया सामन्यात गुलबर्गाचा 8-0 असा पराभव केला. मुलींच्या गटात बेळगाव विभागीय संघाने म्हैसूर संघाचा 1-0 असा पराभव केला तर बेंगळूर संघाकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागला.
शिमोगा येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय माध्यमिक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन नेहरू स्टेडियम व सॅपेड हार्ट स्कूल मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. मुलींच्या गटातील पहिल्या साखळी सामन्यात बेंगळूर संघाने बेळगाव विभागीय संघाचा 1-0 असा पराभव केला. बेंगळूरतर्फे शर्वरीने एकमेव गोल केला. दुसऱया साखळी सामन्यात बेळगाव विभागीय संघाने म्हैसूर विभागीय संघाचा 1-0 असा पराभव करीत पहिला विजय नोंदवला. या सामन्यात बेळगाव विभागीय संघातर्फे विद्या बेलकेरीने गोल नोंदवला.
मुलांच्या विभागात पहिल्या साखळी सामन्यात बेळगाव विभागाच्या सेंट पॉल्स संघाने बलाढय़ डीवायईएस संघाला 1-1 अशा बरोबरीत रोखले. पहिल्या सत्राच्या 32 व्या मिनिटाला अथर्व बीडीने बचाव फळीला चकवत सुरेख गोल करून बेळगाव विभागीय संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात खेळ संपण्यास काही सेकंद बाकी असताना डीवायईएसच्या राज डी.ने बरोबरीचा गोल करून 1-1 अशी बरोबरी साधल्यामुळे सामना बरोबरीत राहिला.
बेळगाव विभागाचा दुसरा सामना गुलबर्गाविरुद्ध झाला. या सामन्यात सातव्या व नवव्या मिनिटाला बेळगावच्या अथर्व बीडीने सलग दोन गोल केले. 17 व्या व 21 व्या मिनिटाला जोस्वा वाझने दोन गोल करून 4-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱया सत्रात बेळगाव संघाने आक्रमक चढाया सुरू केल्या. 42 व्या मिनिटाला बेळगावच्या नेतन पिंटोने पाचवा गोल केला. 46 व्या मिनिटाला नवाल शेख सुरभने सहावा तर 47 व 51 व्या मिनिटाला जोस्वा वाझने दोन गोल करून 8-0 ची आघाडी मिळवून दिली. बेळगाव संघाने 1 विजय व 1 बरोबरीसह चार गुण मिळविले आहेत. मुलींचा पुढील साखळी सामना गुलबर्गा तर मुलांचा पुढील सामना म्हैसूरबरोबर होणार आहे.