क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा हॉकी संघटना आयोजित कॉलेज अंतर्गत हॉकी स्पर्धेत मुलींच्या अंतिम सामन्यात बेळगाव इलेव्हन संघाने केएमएसी बेडकीहाळ संघाचा 5-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
मेजर बी. ए. सय्यद हॉकी मैदानावर आयोजित केलेल्या कॉलेज अंतर्गत हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 11 व 17 व्या मिनिटाला इशा गवाली हिने सलग दोन गोल केले. तर 22 व्या मिनिटाला प्राजक्ता निलजकर हिने गोल करून पहिल्या सत्रात 3-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 32 व्या मिनिटाला इशा गवळीने चौथा गोल तर 35 व्या मिनिटाला प्राजक्ता निलजकरने पाचवा गोल करून 5-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात बेडकीहाळ संघाला गोल करण्यात अपयश आले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष धनंजय पटेल, अप्पासाहेब गुरव, उपाध्यक्ष साजीद शेख, खालिद बेपारी, गोपाळ खांडे, जे. ए. जहागिरदार, सुधाकर चाळखे, प्रकाश हळदणकर, इब्राहिम शेख, आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.