भाऊ कदम-भारत गणेशपुरे यांचे बहारदार सादरीकरण : राजू पवार फौंडेशनतर्फे कॉमेडी चॅरिटेबल शो : ‘मी पुन्हा येईन’ असे म्हणताच एकच हशा
प्रतिनिधी /बेळगाव
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून रसिकांचे मनोरंजन करणारे भाऊ कदम व भारत गणेशपुरे यांनी बेळगावकरांना खळखळून हसायला लावले. बे चा पाढा किती विनोदी अंगानी म्हणता येतो हे भाऊने दाखवून दिले. या जोडगोळीने राजकारण, समाजकारण, शिक्षण यावर विनोद सादर करून रसिकांना मनमुराद हसायला लावले.
रविवारी राजू पवार फौंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेला कॉमेडी चॅरिटेबल शो केएलईच्या शताब्दी सभागृहात पार पडला. रोजच्या जीवनातही अनेक विनोद होत असतात, फक्त त्याचा आनंद घेत नाही. रोजच्या जगण्यातील होणारे विनोद निखळपणे हसवू शकतात हे भाऊ कदम व भारत गणेशपुरे यांनी दाखवून दिले. कडक शिस्तीचा शिक्षक आणि गबाळा विद्यार्थी यांच्या संभाषणातून होणाऱया विनोदाने रसिकांना पोट धरून हसायला लावले.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. विजय देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, केएलईचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी, आयएमएच्या अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ, आयएमएचे माजी अध्यक्ष राजेश लाटकर, आयएमएचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बसवराज बिजर्गी, राजू पवार डान्स अकॅडमीचे राजू पवार उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बेळगाव परिसरातील उत्तम वैद्यकीय सेवा देणाऱया डॉक्टर व हॉस्पिटलचा सत्कार करण्यात आला. राजू पवार डान्स अकॅडमीतर्फे बहारदार असे एकाहून एक सरस डान्स सादर करण्यात आले. लावणी, देशभक्तीपर गीते, चित्रपट संगीतातील गाण्यांवर तरुणांनी केलेल्या नृत्याला रसिकांनी टाळय़ांची दाद दिली.
बेळगावची हवा आणि कुंदा फार आवडला
विनोदाच्या कार्यक्रमानंतर भारत गणेशपुरे व भाऊ कदम यांनी बेळगावच्या रसिकांशी संवाद साधला. अनेक प्रश्नांना विनोदी उत्तरे देत दोघांनीही उपस्थितांचे मनोरंजन केले. बेळगावला प्रथमच आलो असून येथील हवा, कुंदा फार आवडल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. त्याचबरोबर पुढील काळात बेळगावमध्ये विनोदी कार्यक्रमांसाठी उपस्थित राहू हे सांगताना ‘मी पुन्हा येईन’ असे वाक्मय म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.