विभागात बीएमटीसीच्या 50 बस दाखल
बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारकडून बेळगावला नेहमीच दुय्यम वागणूक दिली जाते. याचीच अनुभूती पुन्हा एकदा येत आहे. बेंगळूर मेट्रोपॉलिटन ट्रान्स्पोर्टेशन कार्पोरेशन (बीएमटीसी) ने वापरलेल्या जुन्या बस बेळगावला पाठविण्यात आल्या आहेत. 50 हून अधिक बस बेळगाव व हुबळी विभागाला देण्यात आल्या आहेत. यामुळे बेळगावकरांचा प्रवास या जुन्याच बसमधून होणार आहे. राज्यसरकारकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी बीएमटीसीला केवळ बस खरेदीसाठी दिला जातो. बीएमटीसीच्या 5 लाख कि. मी हून अधिक प्रवास केलेल्या जुन्या खराब झालेल्या बस बेळगावला पाठविण्यात आल्या आहेत. यामुळे जुन्या व खराब झालेल्या बसमधूनच बेळगावच्या प्रवाशांनी प्रवास करायचा का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच काही बसच्या पायऱ्यादेखील निकामी झाल्या असून प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.
बेळगाव विभागातून विविध मार्गांवर 660 बसेस दररोज धावतात. तर चिकोडी विभागातून 640 बसेस दररोज धावतात. जिल्ह्यामध्ये 5 हजारांहून अधिक चालक व वाहक आहेत. शहर तसेच ग्रामीण भागात धावणाऱ्या बऱ्याचशा बसेस या खराब झाल्या असून त्या केव्हा बंद पडतील याची शाश्वती नाही. यामुळे कॉलेज, शाळा, नोकरदार, व्यावसायिक यांना या बससेवेचा फटका बसत आहे. काही मार्गांवर अपुऱ्या बस सोडल्या जात असल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले आहे. अपुऱ्या बससेवेचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याने बसफेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे. सध्याच्या घडीला 50 हून अधिक बसची मागणी करण्यात आली आहे.
नवीन 8 मार्गांवर सेवा सुरू
प्रवाशांच्या मागणीनुसार बस सोडल्या जात आहेत. बेळगाव विभागामध्ये नवीन 8 मार्गांवर सेवा सुरू करण्यात आली आहे. महिलांसाठी 26 जानेवारीपासून 3 नव्या बस सुरू केल्या जाणार आहेत.
– पी. वाय. नाईक (विभागीय नियंत्रक)