वृत्तसंस्था/ इंदोर
2023 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या उपांत्य सामन्यात बंगाल संघाने अंतिम फेरीच्या दिशेने आपली वाटचाल करताना विद्यमान विजेत्या मध्यप्रदेश संघावर 547 धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. बंगालने पहिल्या डावात मध्यप्रदेशवर 268 धावांची यापूर्वीच आघाडी घेतली होती. या भक्कम आघाडीमुळे बंगालने आपली वाटचाल या स्पर्धेच्या अंतिम फेरीकडे केली आहे.
या सामन्यात बंगालने पहिल्या डावात 438 धावा जमवल्या. त्यानंतर मध्यप्रदेशचा पहिला डाव 170 धावा आटोपला. बंगालने 2 बाद 59 या धावसंख्येवरून चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांनी दिवसअखेर 9 बाद 279 धावांपर्यंत मजल मारली. बंगालच्या दुसऱया डावात मुजुमदारने 80 तर पी. प्रामाणिकने नाबाद 60 धावा जमवल्या आहेत. घरमीने 41 धावा केल्या. मध्यप्रदेशतर्फे सारांश जैनने 103 धावात 6 तर कुमार कार्तिकेयने 63 धावात 3 गडी बाद केले आहेत. रणजी स्पर्धेचा अंतिम सामना 16 फेब्रुवारीपासून खेळवला जाईल. संक्षिप्त धावफलक ः बंगाल प. डाव 438, मध्यप्रदेश प. डाव 170, बंगाल दु. डाव 9 बाद 279 (मुजुमदार 80, प्रामाणिक खेळत आहे 60, घरमी 41, एस. जैन 6-103, कार्तिकेय 3-63).