वृत्तसंस्था /पुणे
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या नवव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील बुधवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने तामिळ थलैवाजला 41-41 असे बरोबरीत रोखले.
या सामन्यामध्ये दोन्ही संघांचा खेळ दर्जेदार झाला. बंगाल वॉरियर्सतर्फे मणिंदरसिंगचा खेळ आक्रमक आणि दर्जेदार झाला. त्याने 19 गुण मिळविले. तर कर्णधार दीपक हुडाने 11 गुण नोंदवित मणिंदरसिंगला साथ दिली. तामिळ थलैवाजतर्फे नरेंद्रची कामगिरी सरस ठरली. त्याने 15 गुण मिळविले. तामिळ थलैवाजच्या अजिंक्मय पवारची शेवटची चढाई प्रेक्षणीय ठरली. या चढाईमध्ये त्याने बंगाल वॉरियर्सच्या बालाजी आणि वैभव गर्जे या दोन खेळाडूंना बाद करत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत तामिळ थलैवाजने बंगाल वॉरियर्सवर 26-14 अशी आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धात बंगाल वॉरियर्सच्या चढाया निर्णायक ठरल्याने तामिळ थलैवाजला विजय नोंदविता आला नाही. या सामन्यात बंगाल वॉरियर्सच्या मणिंदरसिंगला परिपूर्ण खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. तर तामिळ थलैवाजच्या नरेंद्रला गेमचेंजर खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.