बेंगळूर / प्रतिनिधी
सोमवारपासून कर्नाटक स्टेट मँगो डेव्हलपमेंट अँड मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (KSMDMCL) हे इंडिया पोस्ट यांच्यामार्फत ग्राहकांना त्यांच्या दारापर्यंत आंबा पोहोच करतील, असे KSMDMCL अधिकाऱ्यांनी सांगितले. KSMDMCL आणि इंडिया पोस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना सुरू केली असून त्याला ग्राहंकांचा भरघोस प्रतिसाद लाभेल असा विश्वास व्यक्त केला.
KSMDMCL चे व्यवस्थापकीय संचालक CG नागराजू म्हणाले, “ आंब्यांच्या ऑनलाइन विक्रीसाठी दोन्ही संस्थांनी वेब पोर्टल (www.karsirimangoes.karnataka. gov.in) सुरू केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही या उपक्रमाचा फायदा झाला आहे. 2020 मध्ये राज्यभरातील 35 हजार ग्राहकांना एकूण 100 टन आंब्याचा पुरवठा करण्यात आला आणि 2021 मध्ये उत्पादन कमी असतानाही 79 टन आंबा 45 हजार ग्राहकांना विकण्यात आला. यावरून असे दिसून येतं की, ग्राहक ऑनलाइन शेतकऱ्यांकडून चांगल्या प्रतीचे आंबे खरेदी करण्यास इच्छुक आहेत.”
या प्रयोगाची सुरवात 2020 मध्ये कोरोना काळा दरम्यान झाली. देशभरात लॉकडाऊन दरम्यान, कर्नाटक राज्य सरकार आणि इंडिया पोस्ट या दोघांनी फळांचा राजा असलेला आंबा, रामनगर, चिक्कबल्लापूर आणि कोलार जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ऑनलाइन मार्केटिंग आणि पोस्टल सेवा वापरून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली होती. या उपक्रमाच्या यशानंतर, KSMDMCL ने 2021 मध्ये इंडिया पोस्टद्वारे आंब्यांचे वितरण चालूच ठेवले आणि यावर्षी देखील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा या विभागाला आहे.