वृत्तसंस्था /पॅरीस (फ्रान्स)
2022 फुटबॉल हंगामासाठी फ्रान्सचा रियल माद्रिद क्लबचा हुकमी फुटबॉलपटू करीम बेन्झेमा तसेच महिलांच्या विभागात ऍलेक्सिया पुतेलास हे बॅलन डीओर पुरस्काराचे मानकरी ठरले. सोमवारी येथे मोठय़ा प्रमाणात पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. या समारंभाला आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच अव्वल फुटबॉलपटू उपस्थित होते.
पुरुष विभागात रियल माद्रिदचा फुटबॉलपटू करीम बेन्झेमा या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. बायर्न म्युनिच संघातील सॅडीओ मॅने दुसऱया स्थानावर तर मँचेस्टर सिटीचा केव्हिन डी ब्रुईन तिसऱया स्थानावर राहिला. 1998 साली फ्रान्सचा झिदान हा पुरस्कार मिळविणारा पहिला प्रेंच फुटबॉलपटू ठरला होता. त्यानंतर करीम बेन्झेमा हा फ्रान्सचा दुसरा मानकरी ठरला आहे. या पुरस्काराबद्दल रियल माद्रिद क्लबच्या अध्यक्षांनी बेन्झेमाचे खास अभिनंदन केले आहे.
महिलांच्या विभागात बर्सिलोना महिला फुटबॉल संघाची ऍलेक्सिया पुतेलासने 2022 सालातील बॅलन डीओर पुरस्कार पटकाविला आहे. पुतेलासने सलग दुसऱयांदा हा पुरस्कार मिळविला आहे. सोमवारी झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात 2022 च्या युरो चषक स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱया इंग्लंड महिला फुटबॉल संघातील अव्वल फुटबॉलपटू बेथ मेडला दुसऱया क्रमांकाचे बक्षीस तसेच चेल्सीच्या सॅम केरला तिसऱया क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. ऍलेक्सियाने 2021-22 च्या फुटबॉल हंगामात आपल्या कामगिरीत सातत्य राखत बार्सिलोना संघाला चॅम्पियन्स लिग फुटबॉल स्पर्धेत सलग दुसऱयांदा अंतिम फेरीपर्यंत नेले होते.