आयटी तरुणांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून सूचना जारी, थायलंड-दुबईतून भारतीयांना भरमसाट पगाराचे आमिष
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आयटी क्षेत्रातील तरुणांसाठी विदेशातील बनावट नोकऱयांबाबत शनिवारी विशेष दिशानिर्देश जारी केले. भारतातील आयटी पदवीधरांना थायलंड आणि दुबईमध्ये भरघोस पगाराच्या नोकऱया देण्याचे आमिष दाखवले जात आहे. त्यात अडकवून तरुणांना वेगळय़ाच धंद्यांमध्ये अडकवले जात असल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर केंद्र सरकारने भारतीयांना सावध केले आहे. सोशल मीडियावर चालणाऱया अशा बनावट जाहिरातींच्या फंदात पडू नका, असे सांगण्यात आले आहे. तसेच परदेशात नोकरीसाठी जाण्यापूर्वी पूर्ण खात्री करून घ्या, असेही सांगण्यात आले आहे. थायलंड आणि म्यानमारमधील भारतीय दुतावासांनी या घोटाळय़ाबाबत आधीच सूचना जारी केल्या असून भारतीय बाजूने हे प्रकरण दोन्ही देशांसमोर मांडले आहे.
बनावट नोकरी रॅकेटचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला आहे. परदेशात नोकरीची ऑफर घेण्यापूर्वी, कंपनी आणि एजंटची सत्यता भारतीय दूतावासाच्या मदतीने तपासली पाहिजे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि इतर ऑनलाईन माध्यमांद्वारे दिलेल्या बनावट नोकरीच्या ऑफरला बळी पडू नका. तसेच, नोकरीच्या ऑफरपूर्वी रिक्रूटिंग एजंटबद्दल शहानिशा करून घ्या, असे दिशानिर्देश केंद्र सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. थायलंडमध्ये रोजगार देण्याच्या नावाखाली भारतीय तरुणांना बनावट जॉब रॅकेटमध्ये अडकवल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने ही ऍडव्हायजरी जारी केली आहे.
बँकॉक आणि म्यानमारमधील भारतीय मिशनच्या वतीने कॉल सेंटर घोटाळा आणि क्रिप्टोकरन्सीच्या फसवणुकीत संशयित आयटी फर्मचा सहभाग असल्याचे प्रकरण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. आयटी क्षेत्राशी निगडित भारतीय तरुणांना दुबई आणि भारतात बसलेल्या एजंट्सच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या जाहिरातीद्वारे थायलंडमध्ये चांगल्या नोकऱया देण्यात आल्या. त्यानंतर पीडित तरुणांना बेकायदेशीरपणे म्यानमारमध्ये नेऊन ओलीस ठेवले आणि कठीण परिस्थितीत काम करायला लावले. संशयित आयटी कंपन्यांनी 100 हून अधिक कामगारांना म्यानमारमध्ये नेल्याची घटना समोर आली आहे.
थायलंड आणि म्यानमारमधील देशाच्या मिशनने ‘डिजिटल सेल्स अँड मार्केटिंग ऑफिसर्स’ या पदांसाठी भारतीय तरुणांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक नोकऱया देणारे बनावट जॉब रॅकेट शोधून काढले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. हे रॅकेट कॉल-सेंटर घोटाळे आणि क्रिप्टो-चलन फसवणुकीत गुंतलेल्या संशयित आयटी कंपन्या चालवत आहेत. आयटी क्षेत्रातील तरुणांना टार्गेट केले जाते, ज्यांना थायलंडमधील आकर्षक डेटा एन्ट्री नोकऱयांच्या नावाखाली दुबई आणि भारतातील एजंटांकडून सोशल मीडियावर जाहिराती देऊन फसवले जाते.